भररस्त्यात नवशिक्या चालक महिलेने दाबला अचानक ब्रेक, तीन कारचे झाले ‘सँडविच’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 01:11 PM2022-04-04T13:11:04+5:302022-04-04T13:12:04+5:30
चार कारच्या विचित्र अपघातांत सर्वांत जास्त नुकसान एमएच २० ईवाय २३८८ या क्रमांकाच्या कारचे झाले
औरंगाबाद : नवीन गाडी घेऊन जाणाऱ्या महिलेने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणाऱ्या तीन कार एकमेकांवर आदळून अपघात झाला. यात एका कारचे मोठे नुकसान झाले. या विचित्र अपघातात जीवितहानी झाली नाही, हे सुदैव.
उच्च न्यायालयाकडून सेव्हन हिलकडे जाणाऱ्या मार्गावर रात्री एक महिला बिगर नंबरची नवीन कोरी कार चालवीत होती. या कारच्या मागे आणखी तीन कार होत्या. त्या महिलेने कारचा अचानक ब्रेक दाबला. त्या पाठीमागून येणाऱ्या तीन कार एकमेकांवर आदळल्या व विचित्र अपघात झाला. ती महिला घाबरून गेली व तिने घटनास्थळी न थांबता कारसह पळ काढला. मागे तुकाराम व्यवहारे यांच्या कार(एमएच २० एमवाय २३८८) च्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. त्यापाठीमागे असलेल्या कार(एमएच ईसी ००२१)च्या समोरील डाव्या बाजूचे नुकसान झाले, तर सर्वांत शेवटी असलेल्या कार(एमएच२० बीवाय ०८८२)चेही समोरील बाजूचे नुकसान झाले.
अपघात पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. घटनेची माहिती कळताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. पोलीस ठाण्यामध्ये तक्रार द्यावे लागेल, असे पोलीस सांगत होते. त्यातील दोन कारचालक स्वत:चे नाव देण्यासही तयार नव्हते. अपघातानंतर बराच वेळ कार घटनास्थळी थांबून होत्या.