क्षुल्लक वाद अन् चाकू थेट तरुणाच्या छातीत आरपार; छत्रपती संभाजीनगरात २४ तासांत २ हत्या
By सुमित डोळे | Updated: October 16, 2024 19:41 IST2024-10-16T19:41:19+5:302024-10-16T19:41:48+5:30
छत्रपती संभाजीनगरात गुन्हेगारी वरचढ, चोवीस तासांमध्ये दोन हत्यांनी शहर हादरले

क्षुल्लक वाद अन् चाकू थेट तरुणाच्या छातीत आरपार; छत्रपती संभाजीनगरात २४ तासांत २ हत्या
छत्रपती संभाजीनगर : चोवीस तासांमध्ये शहरात दोन हत्येच्या घटनांनी शहर हादरले आहे. जुने वाद व नशेखोरीतून अमोल उर्फ नंदु दाभाडे या २१ वर्षीय तरुणाची विश्रांतीनगर मध्ये छातीत चाकू खुपसून हत्या करण्यात आली. बुधवारी दुपारी १२.३० वाजता विश्रांतीनगर मधील एका धार्मिकस्थळामध्येच ही हत्या झाली. निलेश सुभाष चव्हाण असे संशयिताचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
नेहमीप्रमाणे रोजचे घरचे काम आटोपून अमोल दुपारी १२ वाजता परिसरातील एका धार्मिकस्थळाजवळ मित्रांसह बसलेला होता. यावेळी बेधुंद नशेत असलेला निलेश हा कुणाल नावाच्या मित्रासह तेथे गेला. धार्मिकस्थळामध्ये प्रवेश करुन त्याने अमाेल ला दोन्ही हातांनी पकडून बाहेर येण्यास सांगितले. अमोलने त्यास विरोध केल्यावर निलेशने बळजबरी केली. त्यातून त्यांच्यात वाद झाले. अचानक निलेशने एका छोट्या आकाराचा चाकू काढून थेट अमोलच्या छातीत खुपसला. एकाच वारमध्ये अमोल जागेवर कोसळला. जवळच बसलेल्या मित्रांनी धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. घटनेची माहिती कळताच पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हत्या केली अन् घरी जाऊन बसला
अमोलच्या मित्रांनी पोलिसांना निलेशनेच हत्या केल्याचे सांगितले. ही बाब कळताच सहायक फौजदार सुनिल म्हस्के यांनी सहकाऱ्यांसह निलेशचे घर गाठले. तेव्हा तो घरातच बसलेला होता. त्याला ताब्यात घेत ठाण्यात नेण्यात आले. याप्रकरणी अमोलच्या भावाच्या तक्रारीवरुन निलेशवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.