मंदिरातील ३ महिने वास्तव्यात केला प्लॅन;चोरीनंतर १ कोटीच्या सुवर्ण मूर्तीचे तुकडे करून विकले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 11:48 AM2022-12-26T11:48:41+5:302022-12-26T11:49:39+5:30
आरोपींकडून मूर्तीच्या तुकड्यातून बनवलेले सुवर्ण नाणे, रोख रक्कम असा ९५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
औरंगाबाद : जैन धर्मीयांचे पवित्र स्थळ कचनेर (जि. औरंगाबाद) येथील चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातील भगवान पार्श्वनाथांची १ कोटी ५ लाखांची सोन्याची मूर्ती चोरी करणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली आहे. आरोपींनी चातुर्मास दरम्यान तीन महिने मंदिरात वास्तव्य केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
अर्पित नरेंद्र जैन ( ३२, शिवपुरी, मध्यप्रदेश) आणि अनिल विश्वकर्मा (२७ , शहागड, मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. मूर्ती चोरी प्रकरणातील संशयित चातुर्मासामध्ये कचनेर येथे तीन महिने वास्तव्यास होता. त्यानंतर तो दि. ११ ते १४ डिसेंबरदरम्यान कचनेर येथे आला, असे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आले आहे. प्राथमिक माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये पोहोचले. एका पथकाने मध्यप्रदेशातून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी सुवर्ण मूर्तीची अदलाबदल केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. तसेच या मूर्तीचे तुकडे करून सराफाकडे विकले. यातून मिळालेल्या पैशातून कर्ज फेडल्याचे आरोपींनी सांगितले. आरोपींकडून मूर्तीच्या तुकड्यातून बनवलेले सुवर्ण नाणे, रोख रक्कम असा ९५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
१४ डिसेंबर रोजी चोरी
मंदिरातून सुवर्ण मूर्तीची चोरी १४ डिसेंबरच्या सकाळी ७ ते ९ या वेळेत झाली. मंदिरात पूजा झाल्यानंतर त्याचे छायाचित्र दररोज व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये टाकले जाते. १३ डिसेंबरचे छायाचित्र आणि १४ डिसेंबरच्या छायाचित्रात मोठी तफावत आढळून आली. त्यानंतर मूर्तीचा रंग उडत गेल्यानंतर ती पितळेची असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.