पोलीस हवालदार महिनाभरापूर्वी बदलीने गेला अन् ठाण्यासमोरच लाच घेताना पकडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 11:59 AM2022-07-21T11:59:00+5:302022-07-21T11:59:33+5:30

एसीबीची कारवाई : साडू भावांना आरोपी न करण्यासाठी घेतली पाच हजारांची लाच

A police constable went on transfer a month ago and was caught taking bribe in front of the police station | पोलीस हवालदार महिनाभरापूर्वी बदलीने गेला अन् ठाण्यासमोरच लाच घेताना पकडला

पोलीस हवालदार महिनाभरापूर्वी बदलीने गेला अन् ठाण्यासमोरच लाच घेताना पकडला

googlenewsNext

औरंगाबाद : एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात महिनाभरापूर्वी मुकुंदवाडी ठाण्यातून बदलीने गेलेल्या पोलीस हवालदारास तक्रारदार आणि त्याच्या साडूला एका प्रकरणात आरोपी न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना ठाण्यासमोरच रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्याच ठाण्यात हवालदाराच्या विरोधात गुन्हा नोंदविला.

आण्णासाहेब लक्ष्मण सिरसाठ (५५) असे लाच घेणाऱ्या आरोपी हवालदाराचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या विरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. यामध्ये तक्रारदारासह त्याच्या साडूला आरोपी करण्यात येत होते. मात्र, दोघांना आरोपी न करण्यासाठी सिरसाठ याने १० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्याचवेळी तक्रारदाराने लाच मागितल्याचे एसीबीला कळविले. एसीबीच्या पथकाने खात्री केल्यानंतर मंगळवारी रात्री पोलीस ठाण्याच्या समोरच सापळा लावला. तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची रक्कम घेतानाच एसीबीच्या उपअधीक्षक शुभांगी सूर्यवंशी यांच्या पथकाने रंगेहात पकडले. सिरसाठ याच्या विरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस आयुक्तालयात पुन्हा खळबळ उडाली आहे. ही कामगिरी अधीक्षक राहुल खाडे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक शुभांगी सूर्यवंशी, अंमलदार राजेंद्र सिनकर, अशोक नागरगोजे आणि सी. एन. बागुल यांच्या पथकाने केली.

हवालदार आडकला, अधिकाऱ्यांचे काय?
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे मिळविण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा असते. या ठाण्याच्या हद्दीत गुन्हे आणि आर्थिक सुबत्तेमुळे कर्मचाऱ्यांसह इतरही अधिकारी पहिले प्राधान्य देतात. या ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शक्यतो एसीबीचा ट्रॅप होत नाही, असे बोलले जाते. त्याची अनेक कारणे आहेत. आताही किरकोळ हवालदार लाच घेताना पकडण्यात आला. इतर अधिकाऱ्यांचे काय अशी चर्चा आयुक्तालयात सुरू आहे. तसेच दौलताबाद ठाण्यातील दोन कर्मचारी व अधिकाऱ्यांवर एसीबीचा ट्रॅप झाल्यानंतर ठाण्याच्या प्रमुखांना आयुक्तालयात आणले. आता वाळूज एमआयडीसीच्या बाबतीत काय निर्णय होतो, याकडे शहर पोलिसांचे लक्ष लागले आहे.

Web Title: A police constable went on transfer a month ago and was caught taking bribe in front of the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.