लॉजमध्ये थांबलेल्या पंजाबच्या व्यापाऱ्यास पिस्टलचा धाक दाखवून लुटले
By राम शिनगारे | Published: November 17, 2022 09:11 PM2022-11-17T21:11:12+5:302022-11-17T21:11:21+5:30
क्रांतीचौक पोलिसांनी कुख्यात गुंडाना ठोकल्या बेड्या : लुटलेला माल केला जप्त
औरंगाबाद: मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका लॉजवर थांबलेल्या पंजाबच्या व्यापाऱ्यास पिस्टलचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला. गुन्हा दाखल होताच क्रांतीचौक पोलिसांनी दोन कुख्यात गुंडाना पिस्टल, लुटलेल्या मुद्देमालासह अटक केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी दिली.
शेख नजीर उर्फ चिरा शेख शफीक (३०, रा. असेफिया कॉलनी, टाऊन हॉल), मोहम्मद आमेर मो. सलीम (३१, रा. कासंबरी दर्गा) अशी आरोपींची नावे आहेत. बाटला (पंजाब) शहरातील कपडा व्यापारी विशाल भाटीया (३७) हे मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील जनता लॉजमध्ये थांबले होते. बुधवारी मध्यरात्री १२ वाजता त्यांच्या रुमचा दरवाजा पाच वेळा वाजविला. त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा समोर पिस्टल घेऊन दोन जण उभे होते. त्यांनी भाटीया यांच्या तोंडावर बुक्का मारून 'तु आवाज मत कर तेरे को यही मार देगे, तु निचे बैठ जा' असे धमकावले. त्यांच्या हातातील दोन चांदीच्या अंगठ्या, ओम, दोन मोबाईल व रोख असा १३ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.
गुन्हा नोंद होताच निरीक्षक दराडे यांनी सपोनि. विशाल इंगळे, उपनिरीक्षक विकास खटके यांच्या पथकास रवाना केले. पथकाने टेक्सटाईल मिलमध्ये लपून बसलेल्या शेख नजीर व मोहम्मद आमेर या दोघांना गुरुवारी सकाळीच पकडले. नजीरच्या कमरेला गावठी पिस्टल, तर आमेरकडे व्यापाऱ्याचा लुटलेला मुद्देमाल सापडला. या दोघांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. हवालदार संतोष मुदीराज, इरफान खान, संतोष सुर्यवंशी, भावलाल चव्हाण, मस्जीद पटेल, नरेंद्र गुजर, हनुमंत चाळणेवाड, रमेश गायकवाड, पी.के. खांडरे यांनीही कामगिरी बजावली. उपनिरीक्षक विकास खटके अधिक तपास करीत आहेत.
कुख्यात गुंड बबल्याचा साथीदार
कुख्यात गुंड बबल्याचा नजीर शेख हा साथीदार होता. बबल्या जेलमध्ये गेल्यानंतर तो इतरांच्या मदतीने गुंडगीरी करतो. तर दुसरा आरोपी आमेर हा बसस्थानक परिसरात प्रवाशांना लुटत असल्याचेही पोलिसांच्या चौकशीत समोर आले.