शहरानंतर नाव बदलाची मोहीम किल्ल्यापर्यंत; दौलताबाद किल्ल्याचे नाव पुन्हा होणार 'देवगिरी'

By सुमेध उघडे | Published: September 17, 2022 04:59 PM2022-09-17T16:59:39+5:302022-09-17T17:08:34+5:30

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्या पर्यटन विभागातर्फे आज दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भारतमाता मंदिराच्या प्रांगणात एका विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

A renaming campaign after the city to the fort; Daulatabad Fort to be renamed 'Devagiri' | शहरानंतर नाव बदलाची मोहीम किल्ल्यापर्यंत; दौलताबाद किल्ल्याचे नाव पुन्हा होणार 'देवगिरी'

शहरानंतर नाव बदलाची मोहीम किल्ल्यापर्यंत; दौलताबाद किल्ल्याचे नाव पुन्हा होणार 'देवगिरी'

googlenewsNext

औरंगाबाद: शहराजवळील ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याची ओळख पुन्हा एकदा देवगिरी किल्ला करण्यात येईल अशी घोषणा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज केली. औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शहराची नावे बदलाची मोहीम आता किल्ल्याचे नाव बदलापर्यंत आल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे. 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्या पर्यटन विभागातर्फे आज दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भारतमाता मंदिराच्या प्रांगणात एका विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यटन मंत्री लोढा यांनी देवगिरी किल्ल्याला गेल्या काही वर्षात दौलताबादचा किल्ला असं नाव पडलं आहे. ते पुन्हा देवगिरी किल्ला करण्याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती दिली. तसेच इथून पुढे दरवर्षी १७ सप्टेंबरला दौलताबाद येथील भारत माता मंदिराच्या प्रांगणात पर्यटन विभागाच्यावतीने ध्वजारोहण कार्यक्रम पार पडेल असेही त्यांनी सांगितले. शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे राज्य सरकारने पाठवला आहे. यासोबतच शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याचा देखील प्रस्ताव आहे. ही नावे बदल्याची मोहीम आता किल्ल्याचे सुरुवातीचे नाव देण्यापर्यंत आली आहे. 

दौलताबाद किल्ल्याचा थोडक्यात इतिहास
राष्ट्रकूट राजवंशाचा पाडाव झाल्यानंतर त्यांचा मांडलिक असलेल्या भिल्लम यादव (पाचवा) याने देवगिरीवर स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्या वंशात पुढे सिंघणदेव, कृष्णदेव, महादेव, आमणदेव आणि शेवटी रामचंद्रदेव यादव हे राजे झाले. दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी करून यादवांचा पराभव केला आणि संपत्ती लुटली, सत्ता मिळवली. पुढे मुहम्मद तुघलकने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवली होती. याच तुघलकाने देवगिरीचे नाव दौलताबाद केले. मात्र, अनेक अडचणी आल्याने तो पुन्हा दिल्ली गेला. त्यानंतर बहामनी, निजामशाही आणि मुघलांची या प्रदेशावर सत्ता राहिली. मलिक अंबर या वजीराने चांदबीबीच्या मृत्यूनंतर मुघलांपासून वाचवून अहमदनगरच्या निजामाला दौलताबादला आणून इथून त्याच्या नावे राज्य चालवले. त्यानंतर त्यांनी खडकीला तळ हलवला. पुढे मुघलांच्या काळात या खडकीचे नाव औरंगाबाद झाले.

Web Title: A renaming campaign after the city to the fort; Daulatabad Fort to be renamed 'Devagiri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.