नौबत दरवाजाच्या एका बाजूने रस्ता तयार; दुसऱ्या बाजूचे काम ३४ घरांमुळे दीड वर्षांपासून रखडले
By मुजीब देवणीकर | Published: October 5, 2024 07:34 PM2024-10-05T19:34:39+5:302024-10-05T19:35:39+5:30
पुनर्वसनाची फाईल हरवली नंतर सापडली तरी; २,९९,०००,०० अंदाजपत्रक, ८ मे २०२३ रोजी वर्क ऑर्डर
छत्रपती संभाजीनगर : किलेअर्क भागातील ऐतिहासिक नौबत दरवाजाच्या दोन्ही बाजूने रस्ता करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी झाला. एका बाजूने रस्ता तयार झाला. दुसऱ्या बाजूचे काम दीड वर्षांपासून रखडले आहे. रस्त्यासाठी ३४ घरांचा अडसर ठरत आहे. या मालमत्ताधारकांना हर्सूल येथे पर्यायी जागा देण्याचे निश्चित झाले. मात्र, पुनर्वसनाची फाईल अचानक गहाळ झाली. प्रचंड शोधाशोध केल्यानंतर आता फाईल सापडली. मालमत्ताधारकांना प्लॉट वाटप आणि रस्त्याचे काम कधी सुरू होणार हे निश्चित नाही.
नौबत दरवाजामधून दुचाकी, चारचाकी वाहनांची वाहतूक अनेक वर्षांपासून सुरू होती. त्यामुळे दरवाजातून पावसाच्या पाण्याची गळती सुरू झाली. दरवाजा सुरक्षित ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने दोन्ही बाजूने रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला पंचकुंआ कब्रस्तान तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकांची घरे आहेत. रस्त्यासाठी कब्रस्तान कमिटीने त्वरित जागा दिली. मनपाने २ कोटी ९९ लाखांची निविदा काढली. मे २०२३ मध्ये कंत्राटदाराला वर्क ऑर्डर दिली. तीन महिन्यात कब्रस्तानची संरक्षण भिंत मनपाने बांधून दिली. त्यानंतर एका बाजूने रस्ताही पूर्ण करून दिला.
३४ घरांचा प्रश्न गंभीर
रस्त्यासाठी मनपाने चार वर्षांपूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती. दरवाजाला लागून असलेल्या मालमत्ताधारकांनी याला विरोध दर्शविला. पर्यायी जागा दिल्याशिवाय घरे पाडू देणार नाही, अशी भूमिका घेतली. प्रशासनाने बराच वेळ विचार करून जागा देण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला. हर्सूल येथे प्रत्येक मालमत्ताधारकाला ६०० चौरस फुटांची जागा दिली जाईल. त्यानुसार मालमत्ता विभागाने मंजुरीची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर अचानक ही फाईलच गायब झाली.
कुठे फाईल सापडली?
हरवलेली जुनी फाईल १५ दिवसांपूर्वी सापडली. त्यात ३४ मालमत्ताधारकांना प्लॉट देण्यासाठी मंजुरी घेणे सुरू आहे. यातील पाच ते सहा जणांकडे जागेचे कोणतेही कागद नाहीत. त्यांचे काय करावे, असा प्रश्न मालमत्ता विभागाला पडला आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी मनपाला प्लॉट द्यावे लागतील.
लवकर प्रक्रिया करतोय
प्लॉट देण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच मालमत्ताधारकांना हर्सूल येथे प्लॉट दिले जातील. त्यानंतर मालमत्ता अतिक्रमण हटाव विभागातर्फे प्रक्रिया पार पाडण्यात येतील.
- संजय चामले, मालमत्ता अधिकारी, मनपा.
जागा मिळताच काम सुरू
नौबत दरवाजा येथे दुसऱ्या बाजूने रस्ता करण्यासाठी कंत्राटदाराला जागाच उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे काम रखडले. कामाच्या मुदतीत वाढ करण्यात आली. लवकरच काम सुरू होईल.
- बी.डी. फड, कार्यकारी अभियंता, मनपा.