टायर फुटल्याने धावता ट्रक रस्त्यावर उलटला; दैवबलवत्तर म्हणून तिघे बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 04:11 PM2022-12-07T16:11:30+5:302022-12-07T16:11:56+5:30
ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
करमाड (औरंगाबाद) : झारखंड येथून औरंगाबादकडे कोंबडीचे खाद्य घेऊन जाणारा ट्रॅकचा करमाडजवळ उलटला. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात तिघे किरकोळ जखमी झाले. मात्र, भररस्त्यात ट्रक उलटून त्यातून पोती रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.
झारखंड राज्यातील रायपूर येथून कोंबडीचे खाद्य घेऊन एक ट्रॅक ( क्र. डब्ल्यू बी ६७: B.९७६१) औरंगाबादकडे येत होता. दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान करमाड गावाजवळ मागील टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून ट्रॅक पुलावर उलटला. यावेळी दुचाकीवरून ( एम एच .२०. जी एच ०३४८) जाणारे मांडकी येथील रहिवासी सुभान बाबन शहा (४०), आसिफ शहा (१६) व अरबाज शहा (१२) हे ट्रकचा धक्का लागून बाजूला फेकले गेले. दैव बलवत्तर होते म्हणून तिघे किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी करमाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, चालक पिकुंराणा (३०) व क्लिनर रुपेश (२२) हे दोघे जखमी झाले. रुपेश याला जास्त मार लागल्याने त्याला करमाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन. जखमींना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटल्याने वाहतूक कोंडी झाली होती. करमाड पोलिसांनी एकेरी वाहतूक करून वाहनांची कोंडी फोडली. पुढील तपास बीट जमादार सुभाष भाकरे, पोलीस नाईक जारवाल करीत आहेत.