आखाड्यावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; पैसे नाहीत म्हणताच केली चौघांना बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 08:19 PM2022-10-01T20:19:27+5:302022-10-01T20:21:23+5:30
या घटनेतील दरोडेखोरांना पकडण्यासाठी सपोनि गणेश सुरवसे यांनी ठाण्यातील कर्मचाऱ्यांची चार पथके तयार करून त्यांना तपासासाठी रवाना केले.
पाचोड: औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडपासून अर्धा किलोमीटर अंतरावरील एका शेतातील आखाड्यावर शुक्रवारी रात्री १ वाजेच्या सुमारास ६ ते ७ दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून चार जणांना बेदम मारहाण करीत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेली एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड-मुरमा शिवारात जितू शेठ यांची शेती माणिकराव जंगले (मूळ गाव कन्नड) यांनी ठोक्याने केली आहे. ते पत्नी, मुलगा व सून यांच्यासह आखाड्यावरच राहतात. शुक्रवारी रात्री जंगले हे कुटुंबीयांसह जेवण करून झोपले असता रात्री १ वाजेच्या सुमारास ६ ते ७ जण अचानक हातात काठ्या घेऊन आले व त्यांनी जंगले यांच्या घराचा दरवाजा उघडला. यावेळी कुटुंबीय झोपेतून जागे झाले. त्यावेळी या दरोडेखोरांनी त्यांना तुमच्याकडे जे पैसे, दागिने आहेत, ते ताबडतोब काढून द्या, अन्यथा तुम्हाला मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यावेळी माणिकराव जंगले व त्यांचा मुलगा लक्ष्मण जंगले यांनी आमच्याकडे सोन्याचे दागिने नाहीत, पैसे नाहीत, असे म्हणताच दरोडेखोरांनी त्यांना काठीने मारहाण केली.
त्यानंतर उपस्थित महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोर फरार झाले. यावेळी माणिकराव जंगले व लक्ष्मण जंगले यांनी आजूबाजूला राहणाऱ्या शेतकऱ्यांना फोन केला व घडलेली घटना सांगितली. त्यानंतर शेजारचे शेतकरी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी पवार व अधिपारिचारिका वर्षाराणी दळे यांनी जखमींवर उपचार केले. दरोडोखोरांच्या मारहाणीत केसरबाई जंगले या गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घा घटनेची पाचोड पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सपोनि गणेश सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजपूत, पोलीस जमादार गव्हाणे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने नाकाबंदी लावली व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. यावेळी श्वान काही अंतरावर घुटमळले.
चार पथके स्थापन
या घटनेतील दरोडेखोरांना पकडण्यासाठी सपोनि गणेश सुरवसे यांनी ठाण्यातील कर्मचाऱ्यांची चार पथके तयार करून त्यांना तपासासाठी रवाना केले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक पवन बनसोड व पोलीस उपविभागीय अधिकारी बेले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, उपनिरीक्षक विजय जाधव, प्रदीप ठुबे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा शनिवारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.