चिअर्स! एप्रिलमध्ये तळीरामांच्या संख्येत वाढ; औरंगाबादकरांनी ४६२ टक्के अधिक रिचवली बीअर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 06:40 PM2022-05-14T18:40:08+5:302022-05-14T18:40:36+5:30
राज्य उत्पादन शुल्क : २०२१-२२ मध्ये ३ हजार ९३७ कोटींचा शासनाला महसूल
- राम शिनगारे
औरंगाबाद : जिल्ह्यातील एकूण ८२८ परमिट रुम आणि बार, वाईन शॉप व बीअर शॉपीमधून एप्रिल महिन्यात तब्बल ७ लाख ५५ हजार ५१६ लिटर बीअरची विक्री झाली आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे बीअर शॉपी बंद असल्यामुळे विक्री झाली नव्हती. २०१९-२० च्या एप्रिल महिन्यात ६ लाख ४६ हजार ९६८ लिटर बीअरची विक्री झाली होती. त्या तुलनेत यावर्षी झालेल्या विक्रीत तब्बल ४६२ टक्के एवढी वाढ झाली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक सुधाकर कदम यांनी दिली.
औरंगाबाद जिल्ह्यातून राज्य शासनाला उत्पादन शुल्क विभागाच्या दारु विक्रीच्या माध्यमातून २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये तब्बल ३९३७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. २०२०- २१ मध्ये ३ हजार ६८२ कोटींचा महसूल मिळाला होता. त्या तुलनेत नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात महसुलात वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मात्र तसे असतानाही राज्य शासनाने औरंगाबाद जिल्ह्यातून ४ हजार ४७४ कोटी ८० लाख रुपये महसुलाचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी ८८ टक्के ‘टार्गेट’ गाठता आले आहे. महसूल देण्यामध्ये औरंगाबाद जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी राहिला आहे. पहिले स्थान नाशिक जिल्ह्याने पटकावले.
९५८ केंद्रातून दारूची विक्री
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात परमिट रुम आणि बारची संख्या ही ६७० एवढी असून, ३४ वाईन शॉप, १२४ बीअर शॉपी आणि १३० देशी दारूच्या दुकानांना परवानगी देण्यात आलेली आहे. मागील आर्थिक वर्षात नव्याने ८० बारला परवानगी देण्यात आली तर शुल्क न भरल्यामुळे २० बारचा परवाना रद्द केला आहे. महापालिका हद्दीमध्ये बारच्या परवान्यासाठी वर्षी ६ लाख ८३ हजार रुपये शुल्क द्यावे लागते. मागील वर्षी हेच शुल्क ७ लाख ३५ हजार एवढे होते. ग्रामीण भागात बारसाठी प्रतिवर्षी ६२ हजार ३०० रुपये मोजावे लागतात.
तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल पकडला
उत्पादन शुल्क विभागाच्या औरंगाबाद कार्यालयाने २०२१-२२ या वर्षात अवैध दारूविक्री, चोरट्या मार्गाने दारू आणण्यासह इतर प्रकारच्या नियमांचा भंग केल्याच्या प्रकरणात एकूण १ हजार १५३ कारवाया केल्या आहेत. त्यात १ हजार १४५ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ३ कोटी ३ लाख ९० हजार ९०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचेही अधीक्षक कदम यांनी सांगितले.
बिअर, देशी, विदेशीची विक्री
औरंगाबाद जिल्ह्यात २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये बिअरची विक्री ४४ लाख ६३ हजार ७३ लिटर एवढी झाली आहे. विदेशी दारूची विक्री ५९ लाख ८२ हजार ५२ लिटर एवढी झाली. तसेच देशी दारूची विक्री मागच्या वर्षी एक कोटी ४७ लाख २० हजार ३५७ लिटर एवढी झाली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत देशीच्या विक्रीत ११.३३ टक्के, विदेशीत २४.४५ टक्के आणि बिअरमध्ये २१.७८ टक्के एवढी वाढ नोंदवली गेली आहे.