१४ महिन्यांत एकाच दुकानात चारवेळा चोरी; तीनवेळा सिगारेट तर आता सुकामेवा, रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 03:47 PM2023-07-24T15:47:15+5:302023-07-24T15:49:29+5:30
चारही वेळा सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांना दिले; परंतु पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्याची तसदी घेतलेली नाही.
गल्लेबोरगाव (जि. औरंगाबाद) : खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील बसस्थानक परिसरात जुन्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका किराणा दुकानात गेल्या १४ महिन्यांत ४ वेळा चोरी झाली असून चोरट्यांनी तीन वेळा या दुकानातून महागड्या सिगारेटची चोरी केली तर चौथ्या वेळी रविवारी मध्यरात्री काजू, बदाम आणि ५० हजार रुपयांची रक्कम लंपास केली.
गल्लेबोरगाव येथे बसस्थानक परिसरात रामदास चंद्रटिके यांचे पवन किराणा दुकान आहे. या दुकानात चोरट्यांनी यापूर्वी ८ मे २०२२ रोजी चोरी करून ७० हजार रुपयांच्या महागड्या सिगारेटची चोरी केली होती. ही चोरी या किराणा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यात दुकानातील एक व्यक्ती पत्र्याच्या शेडवरील दुसऱ्या व्यक्तीला खालून सिगारेटचे पोते देताना दिसत आहे. दुकान मालक चंद्रटिके यांनी याबाबत खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण केली. सीसीटीव्हीचे फुटेज उपलब्ध असूनही चोरट्यांचा शोध घेतला नाही.
त्यानंतर १ ऑगस्ट २०२२ रोजी चोरट्यांनी या दुकानात पुन्हा चोरी करून १ लाख ५१ हजार ७०० रुपयांच्या सिगारेट चोरून नेल्या. पुन्हा चंद्रटिके यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपासाकडे पुन्हा दुर्लक्ष केले. त्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढले. त्यामुळे २२ मे २०२३ रोजी पुन्हा या चोरट्यांनी हे दुकान फोडून ६० हजार रुपयांच्या सिगारेट चोरून नेल्या. दुकान मालक चंद्रटिके यांनी पुन्हा तीच प्रक्रिया पार पाडली. पोलिसांनीही तीच ती री ओढली. तीन वेळा चोरी करूनही पोलिस कारवाई करीत नसल्याने चोरटे बिनधास्त झाले. त्यांनी २३ जुलैच्या मध्यरात्री पुन्हा हे दुकान फोडले; परंतु यावेळी चंद्रटिके यांनी महागड्या सिगारेट लॉकरमध्ये ठेवल्याने लॉकर फोडण्यात चोरट्यांना अपयश आले. मग त्यांनी दुकानातील २० किलो काजू, २० किलो बदाम आणि गल्ल्यातील ५० हजार रुपये असा ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. आता पुन्हा दुकान मालक चंद्रटिके यांनी खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेहमीप्रमाणे पोलिस या घटनेचा तपास न करता प्रकरण थंड बस्त्यात टाकतात की आता तरी चोरट्यांचा शोध घेतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
चारही चोरींची पद्धत एकच
चंद्रटिके यांच्या पवन किराणा दुकानात १४ महिन्यांत चार वेळा चोरी झाली. चारही वेळा चोरट्याने एकाच पद्धतीने चोरी केली आहे. यात चोरट्याने दुकानाच्या विविध बाजूंनी पत्रा कापून चोरी केली आहे, तसेच चारही वेळा झालेल्या चोरीत एकच चोरटा दुकानातील सीसीटीव्हीत दिसून येत आहे; परंतु तो एकच आहे की अन्य कोणी हे सांगता येणे कठीण आहे. या सीसीटीव्हीचे फुटेज चंद्रटिके यांनी पोलिसांना दिले आहे; परंतु पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्याची तसदी घेतलेली नाही.