आज महिलांवर होणारे अत्याचार पाहता लाज वाटावी, अशी परिस्थिती: भालचंद्र नेमाडे
By बापू सोळुंके | Published: August 12, 2023 12:58 PM2023-08-12T12:58:14+5:302023-08-12T12:59:42+5:30
ब्रिटिशांनी एवढी पापं केली की त्यांना काही फाइल बंद ठेवाव्या लागल्या.
छत्रपती संभाजीनगर : बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव यांनी महिलांच्या कल्याणासाठी अनेक कायदे केले. आज महिलांवर होणारे अत्याचार पाहता लाज वाटावी, अशी परिस्थिती आहे. पिंपरी चिंचवडमधून दरवर्षी ३०० मुली पळविल्या जातात, तर आसाममध्ये घरकामासाठी दीड लाखात मुलीची विक्री होते. मणिपूरची भयावह परिस्थिती पाहता प्रत्येक जाती-जमातीसाठी स्वतंत्र कायद्याची गरज आहे, असे मत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले.
साहित्यिक बाबा भांड संपादित सार्वभौम महाराजा सयाजीराव स्वातंत्र्यवीरांचे पाठीराखे पुस्तकांचे प्रकाशन शुक्रवारी सायंकाळी एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात बडोदा येथील महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगीराजे गायकवाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. नेमाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम आणि प्रा. डॉ. उमेश बगाडे, लेखक भांड व्यासपीठावर उपस्थित होते.
नेमाडे म्हणाले की, ब्रिटिशांनी एवढी पापं केली की त्यांना काही फाइल बंद ठेवाव्या लागल्या. यातील पंधरा फायलींमधून सयाजीरावांनी क्रांतिकारकांना केलेल्या मदतीचे तपशील मिळतात. त्यांनी सामाजिक सुधारणा अधिक केल्या होत्या. पण, आपल्या इतिहासात त्यांचा उल्लेखही नव्हता. बाबा भांड यांनी लंडनमधील बंद फायलींचा अनुवाद करून मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये हे ग्रंथ प्रकाशित केल्याने त्यांचा गुरू म्हणून अभिमान वाटतो. राजद्रोहाच्या कायद्याचा ब्रिटिशांनी स्वैर वापर केला होता. पण, ७५ वर्षांनंतरही आपल्या देशात हा कायदा लागू आहे. स्वातंत्र्याला बेदखल करणारा हा कायदा आहे.
सयाजीराव स्वातंत्र्याचे भोक्ते
हा ग्रंथ आपल्याला समकालीन परिस्थितीचा विचार करायला भाग पाडतो. महाराष्ट्र हा स्वातंत्र्याची प्रेरणा असलेली भूमी आहे आणि सयाजीराव त्या प्रेरणेचे भोक्ते होते. त्यांची राष्ट्रीय चळवळीला सहानुभूती होती, असे डॉ. बगाडे म्हणाले. ब्रिटिश लायब्ररीतून बंद असलेल्या पंधरा फाइल मिळाल्या. त्यातून स्वातंत्र्य चळवळीवर प्रकाश टाकता आला, असे बाबा भांड प्रास्ताविकात म्हणाले. प्रकल्पासाठी सहकार्य करणारे राहुल मगर, प्राचार्य एम. एम. तांबे, शाहीर अजिंक्य लिंगायत आणि संतोष पाटे यांचा सत्कार करण्यात आला. सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले. शिव कदम यांनी आभार मानले.