भरधाव जीपने दुचाकीला उडवले; पती-पत्नीचा मृत्यू, दीड महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 12:29 PM2022-08-03T12:29:14+5:302022-08-03T12:29:29+5:30
पती जागीच ठार झाला तर पत्नीचा उपचार दरम्यान मृत्यू असून जीपमधील अन्य एक महिला गंभीर जखमी आहे
सिल्लोड (औरंगाबाद) : तालुक्यातील पारोळा- डोईफोडा फाट्यावर भरधाव जीपने दुचाकीवरील दाम्पत्यास चिरडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नीचा औरंगाबाद येथे आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुर्गाबाई व सागर ईश्वर सपकाळ ( २७ , रा. बोदवड ता.सिल्लोड) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. दरम्यान, जीपमधील सुनीता मूनसिंग सीसोरिया ( रा.खातळगड जि. बऱ्हाणपूर ) या देखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सागर सपकाळ व दुर्गाबाई हे पती-पत्नी दुचाकीवरून (एमएच- २०, सीजी- ४५८७) सिल्लोड कडून कन्नडकडे जात होते. तर देऊळगाव बाजारकडून एक जीप (एमएच- १४, ४६८७) सिल्लोडकडे जात होती. पिरोळा- डोईफोड़ा फाट्याजवळ भरधाव वेगातील जीपने सपकाळ दाम्पत्याच्या दुचाकीला उडवले. यात सागर सपकाळ जागीच ठार झाले. तर पत्नी दुर्गाबाई सपकाळ गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना तात्काळ नागरिकांनी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. धडकेनंतर जीप रस्त्याच्या खाली उतरून शेजारील शेतात गेली. या अपघाताची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दीड महिन्यापूर्वीच झाले होते लग्न....
सागर व दुर्गाबाई यांचे अवघ्या दीड महिन्यापूर्वी लग्न झाले होते. पतीपत्नी म्हणून नवीन जीवनाची त्यांनी केली. मात्र, काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ,बहिण असा परिवार आहे. सागर वर मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दुसरीकडे बुधवारी पत्नीचा मृत्यू झाला.यामुळे बोदवड गावावर शोक कळा पसरली आहे.