भटक्या कुत्र्यांनी अर्भकाचा मृतदेह उकरून काढल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 12:45 PM2023-12-07T12:45:35+5:302023-12-07T12:45:41+5:30
वाळूज कब्रस्तानात दफन केलेला मृतदेह भटक्या कुत्र्यांनी उकरुन काढल्याची माहिती कळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
वाळूज महानगर : वाळूज कब्रस्तानात महिनाभरापूर्वी दफन केलेले पुरुष जातीचे अर्भक भटक्या कुत्र्यांनी बुधवारी (दि.६) दुपारी १२ वाजेच्या सुमारास उकरुन काढल्याने खळबळ उडाली. या अर्भकाची विल्हेवाट लावणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूजच्या उर्दू जिल्हा परिषद शाळेजवळील शासकीय गायरान जमिनीत विविध समाजाची सार्वजनिक स्मशानभूमी व कब्रस्तान आहे. कब्रस्तानात दफन केलेल्या अर्भकाचा मृतदेह उकरुन काढून भटकी कुत्रे बुधवारी दुपारी त्याचे लचके तोडत होते. हा प्रकार लक्षात येताच दक्ष नागरिकांनी माहिती वाळूज पोलिसांना दिली. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक पोलिस आयुक्त महेंद्र देशमुख, वाळूजचे पोलिस निरीक्षक दिलीप गांगुडे, सहायक निरीक्षक अमोल ढोले, उपनिरीक्षक संदीप शेवाळे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेऊन त्यास शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.
अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
हा मृतदेह पूर्ण वाढ झालेल्या अर्भकाचा असल्याचे पोलिसांनी प्रथमदर्शनी केलेल्या पाहणीतून पुढे आले. अज्ञात व्यक्तीने कुणालाही न कळविता त्यास कब्रस्तानात पुरल्याचा अंदाज वर्तविला आहे. वाळूजला अर्भक सापडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी पोकॉ तुषार सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढोले हे करीत आहेत.