जुन्या वादातून विद्यापीठाच्या नाट्यगृहात विद्यार्थ्यावर चाकूहल्ला
By राम शिनगारे | Published: May 10, 2023 03:14 PM2023-05-10T15:14:27+5:302023-05-10T15:15:52+5:30
विद्यापीठाच्या नाट्यगृहात महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सुरू असताना केला हल्ला
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विद्यमान विद्यार्थ्यावर माजी विद्यार्थ्याने जुन्या वादातून चाकूहल्ला करीत जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री विद्यापीठाच्या नाट्यगृहात घडली. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बेगमपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी विद्यार्थ्याचे संतोष लालबहादूर गौतम (रा. नारेगाव) असे नाव आहे. संतोषच्या तक्रारीवरून माजी विद्यार्थी पृथ्वी खेंगटे याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. विद्यापीठाच्या नाट्यगृहात महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सुरू आहे. सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास संतोष हा त्याचा मित्र वाल्मीक जाधव व इतर मित्रांसोबत कार्यक्रम पाहत होता. तेव्हा माजी विद्यार्थी असलेला पृथ्वी तेथे आला. त्याने ऑगस्ट २०२२ मध्ये एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वाद घालण्यास सुरुवात केली.
पृथ्वीने ‘तू तक्रार का केली’, असे म्हणत खिशातून चाकू काढून कंबरेच्या उजव्या बाजूला वार केला. पुन्हा पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर जिवे मारण्याची धमकी दिली. जखमी संतोषला मित्रांनी घाटीत रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचार करून त्यांनी बेगमपुरा पोलिस ठाणे गाठले. पोलिस उपनिरीक्षक विशाल बोडखे यांनी त्यांचा जबाब नोंदवून पृथ्वीवर गुन्हा दाखल केला.