शेतात लपलेल्या दरोडेखोरांचा तलवारीने हल्ला; पोलिसांच्या गोळीबारात एक दरोडेखोर जखमी

By सुमित डोळे | Published: November 10, 2023 06:19 PM2023-11-10T18:19:32+5:302023-11-10T18:21:20+5:30

५ हवेत, तर सहावी गोळी थेट दरोडेखोराच्या पोटात, १२ तास चालला सिनेस्टाइल थरार

A sword attack by robbers hiding in a field; A robber injured in police firing | शेतात लपलेल्या दरोडेखोरांचा तलवारीने हल्ला; पोलिसांच्या गोळीबारात एक दरोडेखोर जखमी

शेतात लपलेल्या दरोडेखोरांचा तलवारीने हल्ला; पोलिसांच्या गोळीबारात एक दरोडेखोर जखमी

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील मनेगाव शिवार ते कन्नड तालुक्यातील कानडगाव परिसरात गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळीने दीड तासात दोन दरोडे घातले. कुटुंबावर प्राणघातक हल्ला करून लाखोंचा ऐवज लुटला. काही तासांत पोलिसांनी नाकाबंदी लावून दोघांना जागेवर पकडले. उर्वरित दरोडेखोरांचा सकाळपर्यंत शोध सुरू असतानाच शेतात लपून बसलेल्या दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेक करीत तलवारीने हल्ला चढविला. आक्रमक दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अमित ऊर्फ अमीनखान कागद चव्हाण (२३, रा. कोपरगाव) हा दरोडेखोर जखमी झाला. तर, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत, अंमलदार निकम हे दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झाले. बुधवारी रात्री ११ ते गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान पोलिस, दरोडेखोरांमध्ये हा सिनेस्टाइल थरार सुरू होता.

मनेगाव शिवारातील विष्णू सुराशे (५०) हे बुधवारी रात्री ११ वाजता झोपलेले असताना त्यांना मुलाचा ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी धाव घेतली असता चार दरोडेखोर त्याला मारहाण करत होते. दरोडेखोरांनी विष्णू यांना पाहताच त्यांच्यावरही गज, चाकूने वार केले. ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच दरोडेखोरांनी त्यांच्या पत्नीला मारहाण करत अंगावरील १ तोळ्याची पोत, कानातले, पायातले दागिने, मोबाइल हिसकावून पोबारा केला. आरडाओरड ऐकून गावकऱ्यांनी सुराशेंच्या शेतवस्तीकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. घटना कळताच शिऊर ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप पाटील यांनी तत्काळ दरोडेखांराचा शोध सुरू केला.

दोन तासांत कानडगावात
मनेगावातून दरोडेखोरांनी कन्नड तालुक्यातील कानडगावात जात काकासाहेब नलावडे (३२) यांच्या शेतवस्तीवर दरोडा टाकला. काकासाहेब पुण्याला अभियंता असून दिवाळीनिमित्त गावाकडे आले होते. मध्यरात्रीनंतर १:३० वाजता त्यांना आई-वडिलांचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी धाव घेतली तेव्हा दरोडेखोर गळ्याला तलवार लावून मारहाण करत होते. काकासाहेबांना पाहताच त्यांना धमकावून 'जे काही असेल ते पटकन द्या, नसता जीव घेऊ' असे धमकावले. आई, पत्नीला मारहाण करत त्यांच्या अंगावरील ४ तोळ्यांचे गंठण, पोत, ५ ग्रॅमचे कानातले, २५ ग्रॅमच्या ३ अंगठ्या, २ मोबाइल, लॅपटॉप घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. दरोडा टाकण्याआधी दरोडेखाेरांनी शेजाऱ्यांच्या घरांचे दरवाजे बाहेरून बंद केले होते.

११ पथके, ८ ठिकाणी नाकाबंदी, १२ तासांचा थरार
- अधीक्षक मनीष कलवानीया, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी रात्रीतून घटनास्थळांकडे धाव घेतली. ८ पथके तयार करून नाकाबंदी लावली. कानडगावच्या खामखरी नदी परिसरात शोध सुरू असताना साकेगावजवळ छोटा हत्ती वेगात गेल्याचे हॉटेल चालकाने सांगितले. पोलिसांनी बोरसर फाट्यावर २.३० वाजता गाडी आडवी लावून दरोडेखोरांना अडवले.
- पोलिसांना पाहूनही दरोडेखोर शांत होते. गाडीत मागे क्रेट ठेवलेले होते. परंतु पोलिसांनी चाणाक्षपणे गाडीची तपासणी केली. क्रेट हटवून खालील लाकडी फळी काढताच गाडीत दरोडेखोर लपले दिसले. लपलेल्या ६ दरोडेखोरांनी पोलिसांवर क्रेट फेकत शस्त्रांसह हल्ला चढवून पळ काढला. तेथे सागर भोसले (२०) व रावसाहेब पगारे (३५) हे पोलिसांच्या हाती लागले.

शेतकऱ्यांनी सांगितली नेमकी जागा
पहाटे ३ वाजेचा थरार झाल्यानंतर ११ पथकांनी पुन्हा आसपासच्या गावांमध्ये शोध सुरूच ठेवला. गुरुवारी सकाळी ११ वाजता जानेफळ शिवारातील तलावाच्या वरच्या भागात तुरीच्या व मक्याच्या शेतात दरोडेखोर लपल्याचे शेतकऱ्यांकडून कळले.
-पोलिसांनी तेथे जात १५ मिनिटे शरण येण्याचे आवाहन केले. त्यानंतर आत जाण्याचा प्रयत्न करताच दगडांचा तुफान मारा सुरू झाला. क्षणभर पोलिस मागे हटताच दरोडेखाेरांनी शस्त्रांसह त्यांच्यावर हल्ला चढवला. उपनिरीक्षक दुल्हत व अंमलदार निकम यांच्या बरगड्या, छातीवर शस्त्राने गंभीर वार केले. मागून दगडफेक सुरूच होती.

-दरोडेखोर आक्रमक झाल्याने जखमी अवस्थेतही दुल्हत यांनी गोळीबार केला. तरीही अमिनने निकम यांच्यावर तलवार उपसताच दुल्हत यांनी पुढे जात २ राऊंड फायर केले. यात अमिनच्या पोटात गोळी लागून तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर शेतात पाठलाग करून शाम भोसले (२७), धीरज भोसले (१९), पांडुरंग उर्फ भारंब भोसले (२६), परमेश्वर काळे (२२, सर्व रा. कोपरगाव) यांच्या मुसक्या आवळल्या. आठवा दरोडेखोर पळण्यात यशस्वी राहिला.

या सर्वांवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून कठोर कारवाई करणार असल्याचे कलवानिया यांनी सांगितले. निरीक्षक सतिष वाघ, सहायक निरीक्षक संदीप पाटील, राहुल थोरात, अमृत ठोके, विशाल पैठणकर, स्थानिक गुन्हे शाखेचे मधुकर मोरे, विजय जाधव, दीपेश नागझरे, संजय घुगे, अशोक वाघ, देवगाव रंगारीचे सहायक निरीक्षक अमोल मोरे, ऋषिकेश पैठणकर, भावसिंग जारवाल, केशरसिंग राजपूत यांचा कारवाईत सहभाग होता.

Web Title: A sword attack by robbers hiding in a field; A robber injured in police firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.