टेलर शॉप दुसऱ्यांदा फोडले; शिलाई मशीनसह शिवलेल्या ड्रेसवर चोरट्यांचा डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 07:00 PM2023-10-19T19:00:33+5:302023-10-19T19:01:46+5:30
व्यवसाय सुरू केल्यानंतर चार महिन्यात दुसऱ्यांदा चोरी
पैठण : पैठण बसस्थानक परिसरात असलेल्या टेलरींग दुकानाचे कुलूप तोडून शिलाई मशीनसह नवीन कपडे चोरट्यांनी लंपास केले आहे. विशेष म्हणजे चार महिण्या पूर्वी सुध्दा चोरट्यांनी दुकान फोडून शिलाई मशीन व कपडे चोरून नेले होते. आता पुन्हा चोरी झाल्याने टेलर हताश झाले आहे.
पैठण बसस्थानक परिसरातील श्रीनाथ टेलर दुकानाचे बुधवारी रात्री कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील शिलाई मशीन शिवलेले दहा शर्ट, दहा पॅंट, तसेच शिवायला आलेले कपडे सात ड्रेस असा एकूण १२५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. विशेष म्हणजे चार महिण्या पूर्वी देखील अशाच पध्दतीने चोरी झाली होती. तेव्हा सुध्दा चोरट्यांनी शिलाई मशीन व कपडे चोरून नेले होते. त्यावेळेस टेलर बाळासाहेब भास्करराव म्हस्के (४०) रा आखतवाडा यांनी या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली नव्हती.
दरम्यान, पुन्हा शिलाई मशीन आणून बाळासाहेब म्हस्के यांनी व्यवसाय सुरू केला होता. परंतु चार महिन्यात पुन्हा चोरी झाल्याने टेलर बाळासाहेब म्हस्के हताश झाल्याचे दिसून आले. या बाबत बाळासाहेब म्हस्के यांनी पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दांडगे करीत आहेत.