इस्कॉन केंद्रात श्रीरामलीला महोत्सव, अयोध्यातून आलेल्या ३० कलाकारांची टीम करणार सादर
By साहेबराव हिवराळे | Published: October 13, 2023 05:02 PM2023-10-13T17:02:30+5:302023-10-13T17:04:09+5:30
दररोज सायंकाळी ६ वाजेला आरतीने महोत्सवाची सुरुवात होईल. सर्वांसाठी नि: शुल्क प्रवेश आहे.
छत्रपती संभाजीनगर : इस्कॉन- वैदिक शिक्षण आणि सांस्कृतिक केंद्र (इस्कॉन- व्हीईसीसी) वरुड फाटा येथे श्री रामलीला महोत्सव समितीतर्फे श्रीरामलीला महोत्सव रविवार दि.१५ ते मंगळवार २४ ऑक्टोबरपर्यंत होणार आहे.
यासाठी अयोध्येतून ३० कलाकारांची टीम शहरात दाखल होत आहे. “भारत की सर्वश्रेष्ठ रामलीला” पुरस्कार प्राप्त कलाकारांकडून रामलीलांचे प्रत्यक्ष प्रस्तुतीकरण यावेळी डिजिटल स्वरूपात आहे. दररोज सायंकाळी ६ वाजेला आरतीने महोत्सवाची सुरुवात होईल. सर्वांसाठी नि: शुल्क प्रवेश आहे. दररोज रामलीला प्रस्तुतीनंतर सर्वांना महाप्रसाद वितरित केल्या जाणार आहे. दररोज किमान ३००० रामभक्तांची उपस्थिती असेल, असा अंदाज आहे. विजयादशमीच्या दिवशी वीस हजार भाविक उपस्थित राहतील. यावेळी दसरामेळा, रावण दहन व रामराज्याभिषेकाने महोत्सवाची सांगता होईल.
भव्य रंगमंचावर होणार सादरीकरण
महोत्सवासाठी इस्कॉन व्हीईसीसीच्या प्रांगणात वीस हजार स्क्वे. फुटचा भव्य पेंडाॅल उभारण्यात येणार आहे. ४० बाय ३० स्क्वे. फुटच्या भव्य रंगमंचाची निर्मिती केली जात आहे. एलईडी स्क्रीनवर रामलीलेनुसार प्रसंगोचित बॅक ग्राउंड बदलण्याची सोय असेल.
विद्यार्थ्यांसाठी भारताच्या इतिहासावर परीक्षेचे आयोजन
या महोत्सवानिमित्ताने ८ ते १३ वर्षे व १४ ते १८ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी श्री रामायण व आत्मनिर्भर भारताच्या इतिहासावर आधारित नि:शुल्क स्वर्णिम भारत प्रश्नोत्तरी स्पर्धेचे आयोजन श्रीरामलीला महोत्सव समिती, छत्रपती संभाजीनगर व विद्या भारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थानद्वारे केले आहे. प्रथमस्तराची परीक्षा शाळा, क्लासेस, सोसायटी मध्ये होणार असून द्वितीय स्तराची परीक्षा १५ ते २१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत रामलीला महोत्सव परिसरात होणार आहे. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत परीक्षा देता येणार आहे. २५ बहुपर्यायी प्रश्नांच्या प्रथम स्तराच्या परीक्षेत आतापर्यंत १५००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून आणखी किमान १०००० विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. रामलीला महोत्सवास उपस्थित स्पर्धकांना सहभागिता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण समारोह श्रीरामलीला महोत्सवा दरम्यान होणार आहे.
शहर बसची सेवा
शहरवासीयांच्या प्रवासासाठी बाबा पेट्रोलपंप आणि सिडको बसस्थानकातून स्मार्ट सिटी बसेसची सुविधा सायंकाळी ६ वाजेपासून रात्री १०:३० वाजेपर्यंत राहणार आहे.