मैदानाचे गेट गायब करून दिमाखात उभी ३ मजली इमारत जागरूक नागरिकांमुळे जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 04:45 PM2023-03-18T16:45:43+5:302023-03-18T16:46:10+5:30

सिडको एन-५ भागातील राजीव गांधी मैदानाचे गेट गायब करून तीन मजली इमारत मागील अनेक वर्षांपासून दिमाखात उभी होती. 

A three-storied building standing by disappearing the gate of the field was destroyed by conscious citizens in Chhatrapati Sambhajinagar | मैदानाचे गेट गायब करून दिमाखात उभी ३ मजली इमारत जागरूक नागरिकांमुळे जमीनदोस्त

मैदानाचे गेट गायब करून दिमाखात उभी ३ मजली इमारत जागरूक नागरिकांमुळे जमीनदोस्त

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : सिडको-हडकोतील अतिक्रमणे पाडण्याचे आदेश खंडपीठाने दिले. त्यामुळे मनपा प्रशासन आठ दिवसांपासून जोमाने कामाला लागले आहे. एन-५ राजीव गांधी मैदान येथील दुकानांसमोरील पत्र्याचे विविध शेड काढण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी एक तीन मजली इमारतीकडे अंगुलीनिर्देश केला. मैदानाचे गेट गायब करून ही इमारत उभी असल्याचा आरोप करण्यात आला. मनपा, सिडको प्रशासनाने शहनिशा केली तर ते ‘खरे’ निघाले. त्यानंतर शुक्रवारी इमारत मनपाने जमीनदोस्त केली.

एन-५ येथील इमारतीचा मागील दोन दिवसांपासून विषय गाजत होता. गोखले यांच्या इमारतीच्या दर्शनी भागातील दुकान अगोदर तोडण्यात आले. नंतर संपूर्ण इमारतच अनधिकृत असल्याचे समोर आले होते. या कारवाईकडे सिडको-हडकोतील नागरिकांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी दुसरी मोठी कारवाई टी. व्ही. सेंटर भागातील जिजाऊ चौक येथे करण्यात आली. मागील ३० वर्षांपासून मनपा शौचालयाच्या आसपास मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली होती. कारवाई टाळण्यासाठी ग्रामीण भागातील राजकीय मंडळी बराच आटापिटा करीत होती. २० बाय ५० या आकाराच्या जागेत चार दुकानांचे अतिक्रमण अगोदर पाडण्यात आले. सुलभाबाई श्रीपाद जाधव, अरुण अण्णा रोडगे पाटील, जगतसिंग परिहार यांची ही दुकाने होती. विशेष बाब म्हणजे त्यांच्याकडे सिडको, महानगरपालिकेचा कोणताही भाडे करारनामा नव्हता. आता शौचालयात जाण्यासाठी रस्ता मोकळा झाला. हे अतिक्रमण काढल्याने परिसरातील नागरिकांनी मनपाच्या कामाची प्रशंसा केली.

यानंतर एन-९ परिसरातील एम-२ रोडवर महिंद्र बाकरिया यांचे २० बाय ३०, नंदू खैरनार यांचे १० बाय ३० आकाराचे अतिक्रमण काढण्यात आले. याठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांनी कडाडून विरोध केला. सिडकोचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी पोलिसांच्या भाषेत समजावून सांगितल्यानंतर विरोध मावळला. भागातील एकूण ३० अतिक्रमणे काढण्यात आली. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, नगररचनाचे उपअभियंता बाळासाहेब शिरसाट, पूजा भोगे, सिडकोचे चौधरी, मोरे, अतिक्रमणचे निरीक्षक सय्यद जमशेद, पंडित गवळी, मजहर अली यांनी केली.

Web Title: A three-storied building standing by disappearing the gate of the field was destroyed by conscious citizens in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.