समृद्धीवरील अपघातात बचावलेल्या चिमुकल्याने सांगितले अपघात नेमका कसा झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 10:58 AM2023-10-15T10:58:33+5:302023-10-15T11:18:11+5:30
पोलिस जीप ट्रकचा पाठलाग करत होती, ट्रक अचानक थांबला आणि आमची गाडी धडकली
- बाबासाहेब धुमाळ
वैजापूर: नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजता दरम्यान जांबरगाव जवळील आगर सायगाव फाटा येथे वाहतूक शाखा पोलीस किंवा आरटीओ पैकी कोणाची तरी गाडी समोरिल ट्रकचा पाठलाग करत होते, त्यांनतर अचानक ट्रक थांबला आणि आमची गाडी त्यावर धडकली, अशी हकीकत ट्रॅव्हल्स मधील बचावलेल्या सहा वर्षाच्या मुलाने सांगितली. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
समृद्धी महामार्गावर शनिवारी मध्यरात्री मिनी ट्रॅव्हल ट्रकवर धडकून अपघात झाल्याने १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १७ जण गंभीर जखमी आहेत. हा भीषण अपघात नेमका कसा झाला याची चर्चा सुरू असताना यात बचावलेल्या सहा वर्षीय मुलाने धक्कादायक हकीकत सांगितली आहे. त्याने सांगितले की, ट्रक हा मोठ्या स्पीडने असताना त्यामागे एक पोलिसाची गाडी लागलेली होती. सदर पोलिसांची गाडी ट्रकच्या पुढे जाऊन आडवी लावण्याचा प्रयत्न करत असताना ट्रक ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबल्याने आमची गाडी त्यावर आदळली. त्यामुळे मोठा आवाज होऊन अपघात झाला.
ती गाडी आरटीओ कार्यालयाची नाही
आरटीओ कार्यालयाने ट्रक रोखल्याची चर्चा सुरू आहे. मात्र हे आरटीओ कार्यालयाचे वाहन नव्हते. तर महामार्गावर गस्त घालणाऱ्या इतर यंत्रणेचे वाहन होते, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कारवाई करण्यात येईल
घटनेची सर्व माहिती घेऊन संबंधितावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती मनीष कालवनिया पोलीस अधीक्षक ग्रामीण छत्रपती संभाजी नगर यांनी दिली.