विद्यापीठ प्रशासनाला ‘जाग’; सोहळ्याच्या काही तास आधी नव्या निमंत्रण पत्रिका
By संतोष हिरेमठ | Published: September 16, 2022 04:21 PM2022-09-16T16:21:52+5:302022-09-16T16:24:00+5:30
यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह स्थानिक खासदार आणि आमदारांची नावे टाकण्यात आली.
औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण होणार आहे, मात्र या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर केवळ मंत्र्यांचीच नावे ठेवून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याने नवा वाद उफाळला होता. अखेर सोहळ्याच्या काही तास आधी जागे झालेल्या विद्यापीठ प्रशासनाने नव्या निमंत्रण पत्रिका छापल्या. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह स्थानिक खासदार आणि आमदारांची नावे टाकण्यात आली.
पहिल्या निमंत्रण पत्रिकेवर केवळ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्यातील मंत्री संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, उदय सामंत, अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती म्हणून नावे नमूद करण्यात आली होती. मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे नसल्याने भारतीय विद्यार्थी सेना, एमआयएमने विद्यापीठ प्रशासनावर जोरदार टीका केली. अखेर विद्यापीठ प्रशासनाने नव्या निमंत्रण पत्रिका छापल्या.