आठवड्यानंतर पुन्हा बरसला पाऊस; आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 11:54 AM2022-10-07T11:54:27+5:302022-10-07T11:54:44+5:30
मुरू चक्रीवादळाचा परिणाम, ९ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज
औरंगाबाद : सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पाऊस थांबला होता. नवरात्राच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्री व गुरुवारी दुपारी शहरात हजेरी लावली.
पूर्व आशियातील मुरू चक्रीवादळाचा हा परिणाम असून, ९ ऑक्टोबरपर्यंत त्याची तीव्रता राहणार आहे. त्यामुळे पावसाचे आगमन झाल्याचे हवामान अभ्यासक सांगत आहेत. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात १.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्याचे वार्षिक सरासरी (३० सप्टेंबर पर्यंतचे) पर्जन्यमान ५८१.७ मिमी आहे. या तुलनेत आतापर्यंत ६६४ मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत ५९२ मिमी पाऊस आजवर होणे अपेक्षित होते. ११२ टक्के हा पाऊस आहे.
शहरात ११.२ मिमी गुरुवारी दिवसभरात शहर व परिसरात ११.१ मिमी पावसाची नोंद झाली. सुरुवातीला काही भागात पाऊस झाला. त्यानंतर पूर्ण शहरात हलक्या, मध्यम व नंतर जोरदार सरी बरसल्या. सकाळपासून वातावरणात दमटपणा होता. दुपारनंतर वातावरण बदलले आणि पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले. हर्सूल, बंबाटनगर, राजनगर-मुकुंदवाडी, सातारा-देवळाईतील रस्ते नसलेल्या भागात चिखल झाला. नागरिकांना चिखलातून वाट काढत घरापर्यंत जावे लागले.
वादळाची तीव्रता १३ ऑक्टोबरपर्यंत
९ ऑक्टोबरपर्यंत पाऊस बरसणार असल्याचे भाकीत हवामान अभ्यास श्रीनिवास औंधकर यांनी वर्तविले. मुरू नावाच्या जपान व पूर्व आशियातील चक्रीवादळाचा हा परिणाम आहे. १३ ऑक्टोबरपर्यंत या वादळाची तीव्रता राहणार आहे. ९ ऑक्टोबरपर्यंत जास्त तीव्रता असणार आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खान्देशातील काही भागात पावसाची शक्यता आहे.