देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिलेस चिरडून वाहनाने ३० फुट फरफटत नेले; एक महिला गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 11:40 AM2022-09-29T11:40:32+5:302022-09-29T12:13:21+5:30
देव दर्शनासाठी गेलेल्या महिला भाविकांना अज्ञात वाहनाने चिरडले
वाळूजमहानगर (औरंगाबाद) : वाळूज उद्योग नगरीतील वैष्णवीदेवी मंदिरात दर्शनासाठी चालेल्या महिला भाविकास अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास पंढरपूर भाजी मंडई समोर घडली. या भीषण अपघातात मंगलबाई विठ्ठल शहाणे (62, रा. सिडको महानगर) या जागीच ठार झाल्या. तर सुभद्राबाई तुळशीराम राऊत(42 रा सिडको वाळूजमहानगर) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
प्राथमिक माहिती नुसार, सिडको वाळूजमहानगरातील विट्ठल शहाणे हे पत्नी मंगलबाई आणि नातेवाईक सुभद्राबाई तुळशीराम राऊत यांच्यासह आज सकाळी 5.45 वाजेच्या सुमारास घराबाहेर पडले. विठ्ठल शहाणे हे दोघींना पंढरपूरच्या तिरंगा चौकात सोडून मॉर्निंग वॉक साठी निघून गेले. त्यानंतर वैष्णवी देवी मंदिरात दर्शनासाठी पंढरपुरमार्गे दोघी निघाल्या. दरम्यान, सकाळी 6 वाजेच्या सुमारास वाळूजकडून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने या दोघींना पाठीमागून जोराची धडक दिली.
या अपघातात वाहनांच्या चाकाखाली सापडलेल्या मंगलबाई शहाणे यांना वाहनाने जवळपास 30 फूट फरफटत नेले. वाहनाचे चाक कमरेवरून गेल्याने शहाणे यांचा तडफडून जागीच मृत्यू झाला. तर सुभद्राबाई तुळशीराम राऊत या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच उपनिरीक्षक राजेंद्र बांगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. जखमीस 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघातानंतर चालक घटनास्थळाहून वाहनासह पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.