फेसबुकवरील मैत्री विभक्त महिलेच्या अंगलट; आमिष दाखवून अत्याचार; ३५ लाखांची लुबाडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 01:50 PM2022-08-12T13:50:22+5:302022-08-12T13:55:01+5:30
याबाबत ३५ वर्षांच्या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती पतीपासून विभक्त राहते व खासगी नोकरी करते.
औरंगाबाद : पतीपासून विभक्त राहणाऱ्या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून नोकरीच्या आमिषाने ३५ लाख रुपये घेणारा गणेश हिंदराव पवार (रा. कल्याण ईस्ट, मुंबई) याला १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्या. एस. एम. बोहरा यांनी दिले.
याबाबत ३५ वर्षांच्या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती पतीपासून विभक्त राहते व खासगी नोकरी करते. सप्टेंबर २०१८ मध्ये तिची फेसबुकवर पवारशी ओळख, नंतर मैत्री व मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाल्यावर ती विवाहित असून तिला एक मुलगी असल्याचे त्याला सांगितले. पवारने मुलीसह तिला स्वीकारण्याची तयारी दर्शविली. पवारने तिची त्याच्या आई-वडिलांशी ओळख करून दिली. महिलेने लग्नाबाबत विचारले असता, त्याने त्याचे आई-वडील विवाहित महिलेस सून म्हणून स्वीकारणार नाहीत. लग्न करायचे असेल तर तुला सरकारी नोकरी असणे गरजेचे आहे, असा बहाणा करून तिला ठाणे महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आश्वासन देऊन त्यासाठी पैशांची मागणी केली.
पीडितेने प्रथम १५ हजार रुपये त्याच्या बँक खात्यावर टाकले.फेब्रुवारी २०१९ आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये पवार औरंगाबादेत पीडितेला भेटण्यासाठी आला. त्याने तिला एका हॉटेलात नेऊन दोन वेळा तिच्यावर अत्याचार केला. तिने नोकरी लावण्यासाठी त्याला ५० हजार रुपये आणि १३ ग्रॅमची सोनसाखळी दिली. पीडितेने पवारला लग्न आणि नोकरीबाबत तगादा लावला असता त्याने लॉकडाऊनचे कारण सांगून वेळ मारून नेली. महिलेने पैसे परत देण्याचा तगादा लावला असता, त्याने तिचे अश्लील फोटो पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन आणखी पैशांची मागणी केली. पीडितेने पवारला एकूण ३५ लाख रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील जनार्दन जाधव यांनी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची न्यायालयास विनंती केली.