छत्रपती संभाजीनगरात १२४ वर्षांपूर्वी पहिल्या सार्वजनिक गणेश मंडळासाठी महिलेचा पुढाकार

By प्रशांत तेलवाडकर | Published: August 31, 2023 04:51 PM2023-08-31T16:51:55+5:302023-08-31T16:52:29+5:30

कॉंग्रेसचे कार्यकर्ते व माजी नगराध्यक्ष बाबूलाल पराती यांची आई गुलाबबाई पराती यांनी ‘गणेशभक्त भजनी मंडळ’ स्थापन करून पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना १८९९ या वर्षी केली होती.

A woman's initiative for the first public Ganesha mandal 124 years ago in Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात १२४ वर्षांपूर्वी पहिल्या सार्वजनिक गणेश मंडळासाठी महिलेचा पुढाकार

छत्रपती संभाजीनगरात १२४ वर्षांपूर्वी पहिल्या सार्वजनिक गणेश मंडळासाठी महिलेचा पुढाकार

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात जनमानस तयार करण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्याचीच प्रेरणा घेऊन त्यावेळीच छत्रपती संभाजीनगरात सार्वजनिक गणेश मंडळाची सुरुवात कोणी पुरुषाने नव्हे तर एका महिलेच्या पुढाकाराने झाली. त्या मंडळाची स्थापना राजा बाजारात झाली होती, यास यंदा १२४ वर्षे पूर्ण होत आहेत.

कॉंग्रेसचे कार्यकर्ते व माजी नगराध्यक्ष बाबूलाल पराती यांची आई गुलाबबाई पराती यांनी ‘गणेशभक्त भजनी मंडळ’ स्थापन करून पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना १८९९ या वर्षी केली होती. शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिरासमोरील भागात पराती यांचे मिठाईचे दुकान होते. याच दुकानात एकाबाजूला गणपतीची मूर्ती ठेवण्यात आली. तुपाचे डब्बे आणि त्यावर लाकड्याच्या ५ पायऱ्या रचल्या, वरच्या पायरीवर गणेश मूर्ती आणि खालच्या चार पायऱ्यांवर खेळणी मांडण्यात आल्या होत्या. गुलाबबाई पराती यांचे माहेर पुण्याचे त्यांनी माहेरहून खेळणी आणली होती. हा देखावा बघण्यासाठी त्यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या वाढत गेली, यानंतर १९२४ साली सार्वजनिक गणेश महासंघाची स्थापना झाली. पण, पहिले गणेश मंडळ स्थापन करण्याचा मान गुलाबबाई पराती या महिलेलाच जातो.

टिळकांच्या भाषणाने गुलाबबाई पराती झाल्या होत्या प्रभावित
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९४ मध्ये पुण्यातील विंचूरकर वाड्यात सार्वजनिक गणपतीची स्थापना केली. टिळक हे खटल्याच्या निमित्ताने १८९९ छत्रपती संभाजीनगरात आले असताना त्यांचे जाहीर भाषण ऐकण्यासाठी राजा बाजारातील रहिवासी गुलाबबाई पराती या शहागंजात गेल्या होत्या. त्यावेळी टिळकांनी सर्वांना सार्वजनिक गणेश मंडळ स्थापन करण्याचे आवाहन केले. त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन गुलाबबाई पराती यांनी गणेशभक्त भजनी मंडळाची स्थापना करून त्यावर्षी आपल्या मिठाईच्या दुकानात सार्वजनिक गणेश मंडळाचा गणपती बसविला. हे मंडळ शहरातील पहिले गणेश मंडळ ठरले.

टांग्यात आणली होती मूर्ती
त्या काळी मछलीखडक रस्त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती विक्री होत असे. गणेशभक्त भजनी मंडळाची पहिली गणपती मूर्ती याच मछली खडकाहून टांग्यातून आणण्यात आली होती. भजनी मंडळाच्या सर्व सदस्यांनी भजन म्हणत मूर्तीला वाजत गाजत राजा बाजारात आणले होते. गणेश भक्त भजनी मंडळाचा गणपती १९७० पर्यंत बसत होता. आता पराती यांच्या घरात गणपती बसविला जात असून गणेशोत्सवात पराती परिवाराचे सर्व सदस्य एकत्र येऊन आरती करीत असतात.

Web Title: A woman's initiative for the first public Ganesha mandal 124 years ago in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.