प्रेमीयुगुलाची रेल्वेसमोर उडी; युवकाचा मृत्यू, विवाहिता बचावली, छत्रपती संभाजीनगरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 11:20 AM2023-03-30T11:20:26+5:302023-03-30T11:22:05+5:30
युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर युवती जखमी झाली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : एक महिन्यापूर्वी विवाह झालेल्या युवतीने प्रियकरासोबत ठाण्यातून पळ काढला. पुण्यातून हे जोडपे छत्रपती संभाजीनगरात मंगळवारी सायंकाळी दाखल झाले. एकनाथनगर भागातील रेल्वेसमोर रात्री ९.३० वाजता युवकाने उडी घेतली. त्याच्यापाठोपाठ युवतीनेही उडी घेण्याचा प्रयत्न केला. युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर युवती जखमी झाली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उमेश मोहन तारू (२३, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव), असे मृत प्रियकराचे, तर पूजा विनोद तायडे (१९, रा. हनुमानकुंडनगर, ता. मुक्ताईनगर), असे युवतीचे नाव आहे. उमेश व पूजा यांचे प्रेमसंबंध होते. त्यास दोन्ही कुटुंबांचा विरोध होता. पूजाचा विवाह मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील युवकासोबत २८ फेब्रुवारी २०२३ रोजी झाला. पूजाचा पती ठाण्यामध्ये एका खासगी कंपनीत नोकरीला आहे.
दोन दिवसांपूर्वी ती ठाण्यात नवऱ्याकडे गेली. उमेश तिला भेटण्यासाठी ठाण्यात गेला. तेथून दोघे पळून पुण्यात आले. त्यानंतर दोघे छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी सायंकाळी पोहोचले. दोघांच्या कुटुंबांना ते सोबत असल्याचे समजल्यानंतर त्यांचे फोन सुरू झाले. अशातच पूजा उमेशच्या मोबाइलवरून त्याच्या भावाशी बोलत असतानाच उमेशने रेल्वेसमोर उडी घेतली.
ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल
पूजाच्या पतीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार मंगळवारी ठाण्यातील एका पोलिस ठाण्यात नोंदवली. पूजाच्या विवाहास मंगळवारी एक महिना पूर्ण झाला. बरोबर एका महिन्यानंतरच तिच्या प्रियकराने आत्महत्या केली. पूजा सुदैवाने बचावली.