कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू
By राम शिनगारे | Published: April 24, 2023 12:16 PM2023-04-24T12:16:39+5:302023-04-24T12:18:11+5:30
मृत तरुण हा एमबीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याची माहिती आहे.
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम विद्यापीठातील एमबीएच्या द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्राची अंतर्गत चाचणी परीक्षा देण्यासाठी घरातून निघालेल्या युवकाचा कचऱ्याच्या कॉम्पॅक्टर गाडीखाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २४) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सेंट्रल नाका परिसरातील पोलिस उपायुक्त कार्यालयासमोर घडली. या घटनेची नोंद सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
ओमकार लक्ष्मण थोरात (२३, रा. जुना बायजीपुरा) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओमकार हा एमजीएम संस्थेतील एमबीएच्या चौथ्या सत्रात शिक्षण घेत होता. महाविद्यालयात ८ मेपासून अंतिम परीक्षांना सुरुवात होणार होती. त्यापूर्वी अंतर्गत चाचणी परीक्षा सुरू होत्या. चाचणी परीक्षा देण्यासाठी ओमकार सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (क्र. एमएच २० एफसी ३४८०) सेंट्रल नाक्यासमाेरून महाविद्यालयात जात होता. पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन कार्यालयाच्या पुढे गेल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगात कचरा वाहून नेणारा कॉम्पॅक्टर (क्र. एमएच २० ईएल २८५६) येत होता. त्याच्या पुढे ओमकारची दुचाकी होती.
दरम्यान, दुचाकीच्या पुढे असलेल्या एका कारने त्यास हुलकावणी दिल्यामुळे ओमकार रस्त्यावर पडला. दुचाकी बाजूला निसटली. तेवढ्यात मागून भरधाव येणाऱ्या कॉम्पॅक्टरच्या पाठीमागील चारचाकी टायर ओमकारच्या डोक्यावरून गेले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती समजताच सिडकोचे निरीक्षक संभाजी पवार, ड्यूटी ऑफिसर सपोनि. राजेंद्र बनसोडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. ओमकारला घाटी रुग्णालयात पाठविल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. अधिक तपास उपनिरीक्षक द्वारकादास भालेराव करीत आहेत.