दुसऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावले प्राण; सहा महिन्यांतच कुटुंबास दुसरा धक्का
By सुमित डोळे | Published: November 16, 2023 06:19 PM2023-11-16T18:19:46+5:302023-11-16T18:20:27+5:30
कुटुंबातील मोठ्या मुलाचा सुसाट कारच्या धडकेत जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : एका दुचाकीचालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात विशाल भास्कर नवगिरे (२८) या तरुणाने स्वत:चे प्राण गमावले. रविवारी सायंकाळी तो मित्रासह जात असताना मागून आलेल्या सुसाट कारच्या धडकेत त्याचा अंत झाला. चिकलठाणा ते केंब्रिज चौक रस्त्यावर हा अपघात घडला.
मुकुंदवाडीत राहणारा विशाल केंब्रिज चौकातील एका आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात सुपरवायझर होता. रविवारी त्याला सुटी होती. दुपारी ४ वाजता मित्र मनोज घुगेसोबत बाहेर जाण्याचे ठरल्यावर दोघे दुचाकीने केंब्रिज चौकाच्या दिशेने गेले. दरम्यान, दिवाळीनिमित्त त्यांनी बुटांची खरेदी केली. खरेदी करून ते दोघेही घराच्या दिशेने निघाले होते. मात्र एका कारने हूल दिल्याने त्याच्याजवळून जाणाऱ्या दुचाकीचालकाचा अपघात घडण्याची शक्यता होती. त्याला वाचवण्यासाठी विशालने दुचाकी बाजूला घेताच दुसऱ्या सुसाट जाणाऱ्या कारने त्याला धडक दिली. यात तो व मनोज लांबपर्यंत फेकले गेले. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी सिडको ठाण्याचे सहायक फौजदार विष्णू मुंढे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोके, छातीला गंभीर दुखापत झाल्याने विशालचा मृत्यू झाला. मनोजवर उपचार सुरू आहेत.
सहा महिन्यांतच कुटुंबाने दुसरा आधार गमावला
विशाल भावंडांमध्ये मोठा होता. त्याच्या कुटुंबात आई, दोन भाऊ, एक बहीण आहे. केंब्रिज चौकातील एका औषधाच्या दुकानात सुपरवायझरची नोकरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. सहा महिन्यांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. सहा महिन्यांतच कुटुंबाने दुसरा आधारदेखील गमावल्याने मित्र, नातेवाइकांना अश्रू अनावर झाले होते.