स्पर्धा परीक्षांची पुस्तक घेऊन फिरणाऱ्या तरुणाची अचानक गाड्यांवर दगडफेक
By राम शिनगारे | Published: March 15, 2023 07:11 PM2023-03-15T19:11:54+5:302023-03-15T19:12:42+5:30
जमावाने दिला बेदम चोप; मानसिक रुग्ण असल्याची पोलिसांची माहिती
छत्रपती संभाजीनगर : बाबा पेट्रोल पंपाच्या उड्डाणपुलावरून खाली उतरल्यानंतर रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगातील पाच ते सहा गाड्यांवर एका उच्चशिक्षीत माथेफिरूने दगडफेक केल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजता घडली. दगडफेक करणाऱ्या युवकाकडे स्पर्धा परीक्षांची पुस्तके आढळुन आली. या प्रकरणी एका गाडीचालकाने दिलेल्या तक्रारीवरून माथेफिरूच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
संजय मगण गांगे (रा. गल्ली नंबर २, मुकुंदवाडी) असे दगड मारणाऱ्याचे नाव आहे. पराग मोहन गुजराती हे डीसीबी बँकेत व्यवस्थापक आहेत. ते बुधवारी सकाळी चारचाकी गाडीतुन (एमएच २० जीई ४५९२) जात असताना उड्डाणपुल संपल्यानंतर गॅसपंपाच्या बाजूलाच पद्मपुराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एक मोठा दगड त्यांच्या गाडीच्या काचाच्या दिशेने आला. यात गाडीची समोरची काच फुटली. राजाराम बाबुराव दिंडे यांच्या गाडीवर (एमएच २० ईवाय ८२४२) ही दगड मारला. त्याशिवाय एमएच ०४ एफआर ३७९८ या गाडीसह इतर तीन गाड्यांच्याही काचांवर दगड मारण्यात आले. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी दिली. जमावाने पकडलेल्या तरुणाकडे इंग्लिश स्पिकींग कोर्ससह स्पर्धा परीक्षांची पुस्तकेही आढळून आली आहेत. संजय गांगे याच्यावर मानसिक परिणाम झालेला असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली.
नागरिकांनी दिला चोप
येणाऱ्या गाड्यांच्या काचांवर दगड मारणाऱ्या माथेफिरू संजय गांगे यास जमलेल्या नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. त्याचवेळी पोलिसांची गाडी बोलावून घेत त्यांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणी केली. त्यात त्याने नशा केलेली नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पोलिस ठाण्यात आणल्यानंतर गांगे यास पोलिसांनी पिण्यासाठी पाणी दिले. बाटलीतील पाणी पिल्यानंतर शिल्लक राहिलेले काही पाणी पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर टाकल्याचेही समोर आले आहे.