बसस्थानकाजवळ तरुणाला धमकावून लुटले, मदतीला आलेलाही निघाला चोरट्यांचाच साथीदार
By सुमित डोळे | Published: December 4, 2023 08:32 PM2023-12-04T20:32:28+5:302023-12-04T20:32:39+5:30
दोघांनी लुटले, तिसऱ्याने केला मदतीचा बहाणा
छत्रपती संभाजीनगर : घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत असलेल्या तरुणाला दोघांनी धमकावून लुटले. रविवारी सायंकाळी रहदारीच्या वेळी सिडको बसस्थानकाजवळ गुंडांनी ही हिंमत केली. यात तरुणाचा मोबाईल व ३ हजार ६०० रुपये चोरट्यांनी हिसकावून नेले.
अप्पासाहेब दाभाडे (३५, रा. धोपटेश्वर, बदनापुर) हे महावितरण मध्ये वरीष्ठ तंत्रज्ञ आहेत. ३ डिसेंबर रोजी मिलकॉर्नर जवळील कार्यालयात कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणूकीसाठी ते शहरात आले होते. मतदान करुन ते घरी जाण्यासाठी निघाले. सायंकाळी ७ वाजता सिडको चौकातील उड्डाणपुलाजवळ बसची वाट पाहत थांबले. तेव्हा लांब केस असलेला तरुण त्यांच्याकडे गेला. 'तुला कुठे जायचे आहे, मी सोडताे' असे म्हणत त्याने अचानक अप्पासाहेब यांची कॉलर पकडली. बळजबरीने ओढून उभे करत मोबाईल हिसकावून घेतला. त्याच्या दुसऱ्या साथीदाराने पळत येत रोख असलेले वॉलेट काढून घेतले.
मदतीचा बहाणा, गुंडांचाच साथीदार
दोघे लुटून निघून गेले व तेवढ्यात एक दुचाकीस्वार तेथे गेला. तुमचा मोबाईल, वॉलेट मी मिळवून देतो, असे म्हणत तो समोर गेला. परंतू लुटणारे दोघे त्याच्याच दुचाकीवर बसून निघून गेले. घटनेनंतर त्यांनी थेट एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठले. यापूर्वी देखील सायंकाळ नंतर सिडको चौक, बसस्थानक परिसरात लुटमारीच्या घटना घडल्या आहेत.