वीटभट्टीत भिंत पडून कामगार युवकाचा मृत्यू, हर्सूल परिसरातील घटना
By राम शिनगारे | Published: February 8, 2023 09:01 PM2023-02-08T21:01:12+5:302023-02-08T21:01:19+5:30
मृताच्या नातेवाइकांनी बल्करमध्ये आलेल्या राखेतील केमिकलचा स्फोट झाला. या स्फोटामुळे भिंती कोसळून भावनेशचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.
औरंगाबाद : हर्सूल परिसरात वीटभट्टीमध्ये एक धक्कादायक दुर्घटना घडली. एका छोट्या खोलीमध्ये झोपलेल्या कुटुंबाच्या अंगावर मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता भिंत पडली. त्यात चौघेजण आतमध्ये गाडले गेले. त्यातील एका युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी हर्सूल पोलिस तपास करीत असल्याची माहिती निरीक्षक अमोल देवकर यांनी दिली.
भावनेश नंदू पवार (१९, रा. बिडकीन, ता. पैठण, ह.मु. चेतनानगर वीटभट्टी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. जखमींमध्ये मृताचे वडील नंदू पवार (४५), आई चंदा पवार (४०) आणि भाऊ योगेश पवार (१७) यांचा समावेश आहे. चेतनानगरमध्ये मातीसह सिमेंटच्या विटा बनविण्यात येणारी भट्टी आहे. त्याठिकाणी पवार कुटुंब कामाला आहे. एका बल्करमध्ये (एमएच २१, एक्स ८३८६) औष्णिक विद्युत केंद्रातून राख आणली होती. ही राख पाइपच्या माध्यमातून एका कच्च्या खोलीत टाकली जात होती.
याच खोलीच्या शेजारी कच्च्या विटांनी बनविलेल्या खोलीत पवार कुटुंब झोपले होते. खोलीत टाकल्या जाणाऱ्या राखेच्या दाबातून त्या खोलीसह शेजारच्या खोलीची भिंत कोसळली. भिंतीत पवार कुटुंबीय गाडले गेले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत चौघांना माती, विटांच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढून घाटी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून भावनेशचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. भावनेशचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास उपनिरीक्षक सुनील चव्हाण करीत आहेत.
केमिकलचा स्फोट का?
मृताच्या नातेवाइकांनी बल्करमध्ये आलेल्या राखेतील केमिकलचा स्फोट झाला. या स्फोटामुळे भिंती कोसळून भावनेशचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, नातेवाइकांनी तक्रार दिल्यानंतर संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.