अबब...वैजापूरकर घेतात ८० लाखांचे विकत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 01:09 AM2018-05-14T01:09:56+5:302018-05-14T01:10:34+5:30

शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके जाणवायला लागल्याने नागरिकांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत असून त्यांना शासनाच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पण या टँकरमुळे गावकऱ्यांची तहान भागत नसल्याने त्यांच्यावर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. यातून खासगी टँकरवाल्यांची चांदी होत असून दरमहा ७० ते ८० लाख रुपयांची उलाढाल या धंद्यातून होत आहे.

 Aab ... take Vajapurkar to buy 80 lakhs of water | अबब...वैजापूरकर घेतात ८० लाखांचे विकत पाणी

अबब...वैजापूरकर घेतात ८० लाखांचे विकत पाणी

googlenewsNext

मोबीन खान
वैजापूर : शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके जाणवायला लागल्याने नागरिकांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत असून त्यांना शासनाच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पण या टँकरमुळे गावकऱ्यांची तहान भागत नसल्याने त्यांच्यावर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. यातून खासगी टँकरवाल्यांची चांदी होत असून दरमहा ७० ते ८० लाख रुपयांची उलाढाल या धंद्यातून होत आहे.
सध्या वैजापूर तालुक्यात जवळपास ८० ते ९० खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात असून कमीत कमी टँकर सुरू करण्याचे शासनाचे धोरण टँकर लॉबीच्या पथ्यावर पडल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. त्यामुळे टँकरची मागणी करणारे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल होत असून कासवगतीने त्यांना मंजुरी मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
तालुक्यात यंदा जलयुक्त शिवार योजनेचे यश दाखविण्यासाठी प्रशासन टँकरच्या प्रस्तांवाना प्रलंबित ठेवत टँकर नाकारत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळाची दाहकता जाणवायला लागली आहे. पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरु झाली असली तरी प्रशासनातील अधिकाºयांना त्याचे कोणतेही सोयरसूतक नसल्याचेच दिसते. वैजापूर तालुक्यात ही योजनाच संशयाच्या गर्तेत सापडली आहे. त्यामुळे एकाही ठिकाणी योजनेतून फारसे काही हाती आल्याचे दिसत नाही. प्रशासकीय पातळीवरदेखील या योजनांसंदर्भात माध्यमांना माहिती देण्यासाठी अधिकारी उत्सुक नाहीत. अधिकारी कार्यालयात बसून दुष्काळ निवारण करत आहेत. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी सर्वच पातळ्यांवर टंचाईच्या प्रस्तावाच्या फायलींचा प्रवास संथगतीने सुरु आहे.
पाणीटंचाईसारख्या विषयातदेखील प्रशासन अध्याप गंभीर नाही. चार ते पाच वर्षांपूर्वी टंचाईग्रस्त गावात लोकसहभागातील पाणीपुरवठा नळयोजना राबविण्यात आल्या. मात्र त्या योजना अर्धवट अवस्थेत असल्यामुळे कायमस्वरूपी पाणीटंचाईवर मात करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. ‘नेमेचि भासते पाणीटंचाई’ अशी वैजापूर तालुक्याची अवस्था झाली असून यंदाच्या उन्हाळ्यातही जवळपास ८० ते ९० खासगी टँकरने ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जात आहे. यातून टँकरवाल्यांची महिन्याला ८० लाख रुपयांची मोठी कमाई होत आहे. गावातील लोकांना खासगी टँकरने नाईलाजस्तव पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यातच सदोष पाणीपुरवठा योजनेमुळे व पाणी पुरवठा करणाºया पाईपलाईन गंजून गेल्याने नागरिकांना अनेक वेळा दूषित पाणीपुरवठा होतो. आधीच कडक उन्हाळा, त्यातच अत्यंत अपुरा पाणीपुरवठा आणि मिळणारे पाणीही पिण्याला योग्य नाही, अशा परिस्थितीमुळे वैजापूर तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
चौकट...
वैजापूर तालुक्यातील १६३ गावात पाण्याचे सुमारे ८० ते ९० खासगी टँकर चालतात. हे टँकर हजार आणि १२ हजार लिटर क्षमतेचे आहेत. हंडाभर पाण्यासाठी ५ रुपये, ५०० लिटरचे पाणी २०० रुपये, हजार लिटर पाणी ४०० रुपयात मिळते. हे टँकर शहरालगतच्या गावांमधील विहिरी, बावडी आणि बोअरमधून भरले जातात. शहरातही काही ठिकाणी बोअरद्वारे टँकर भरले जातात. यासाठी विहीर किंवा बोअर मालकाला २०० ते ५०० रुपये द्यावे लागतात. या सर्व टँकरची महिन्याला ८० लाख रुपयांची उलाढाल पाणी विक्रीतून होत असल्याचे टँकर मालकांनी सांगितले.

Web Title:  Aab ... take Vajapurkar to buy 80 lakhs of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.