‘आधार’ने शाळा बेजार अन् पालक बसले थंडगार; पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचे अपडेटिंग राहिले
By विजय सरवदे | Published: May 6, 2023 12:50 PM2023-05-06T12:50:19+5:302023-05-06T12:53:33+5:30
या संदर्भात पालकांकडूनही शाळांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शिक्षक आता मेटाकुटीला आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर :शाळास्तरावर मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड अपडेटिंगचे काम सुरू आहे. यासाठी ३० एप्रिलची दिलेली डेडलाइन संपली. तरीही अजून तब्बल १ लाख ८६ हजार ४६६ विद्यार्थ्यांचे आधार अपडेशन झालेले नाही. यापुढे विद्यार्थ्यांचे ‘आधार’ नाही, तर शाळांना कोणत्याही योजनेचे अनुदान ना शिक्षकांना पगारही नाही, ही भूमिका शासनाने घेतली असल्यामुळे आधार कार्ड अपडेशनसाठी शाळा रात्रंदिवस झटत आहेत. या संदर्भात पालकांकडूनही शाळांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शिक्षक आता मेटाकुटीला आले आहेत.
यापुढे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरच संचमान्यता होणार आहे. मात्र, अजूनही जिल्ह्यातील साडेचार हजारांपैकी ७५ टक्के शाळांचे आधार अपडेशन रखडले आहे. परिणामी, संचमान्यताही खोळंबली आहे. संचमान्यतेत जेवढे आधार कार्ड, तेवढीच पटसंख्या गणली जाणार आहे. त्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.
संचमान्यतेसाठी शिक्षण विभागाने स्टुडंट्स पोर्टलवर ३० एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी आणि प्रमाणीकरण बंधनकारक केले होते. मात्र, पोर्टल सतत हँग होत असल्यामुळे शाळांना आधार अपडेट करण्यास अडचणी येत होत्या. अनेकदा काही विद्यार्थ्यांची आधारवरील माहिती जुळत नाही. या संदर्भात शाळांनी पालकांशी संपर्क साधला; पण पालकांकडून प्रतिसाद मिळत नाही. शिक्षण विभागाकडून आधार डेटा बेससंबंधी वारंवार आढावा घेतला जात आहे. त्यामुळे आता अनेक मुख्याध्यापक व शिक्षक वैतागले आहेत.
अखेर शिक्षणाधिकाऱ्यांची विनंती
आधार अपडेशनची मुदत संपलेली असली, तरी आठ-दहा दिवसांची आणखी मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा आहे. आता स्टुडंट्स पोर्टलही सुरळीत झाले आहे. काही मुख्याध्यापकांनी आधार अपडेशनकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवत आहे. त्यामुळे ७२ हजार विद्यार्थ्यांची आधार अपडेशनची प्रक्रियाच झालेली नाही, तर ९२ हजार विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. यासाठी हात जोडून विनंती करतो की, आधारमुळेच आपला टिकाव लागणार आहे. यामुळे आधार अपडेशनची प्रक्रिया गतिमान करा.
- एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी
आकडेवारी :
४,५०० शाळा
९,१७,८९५ विद्यार्थी
८,९९,५९२ विद्यार्थ्यांचे आधार प्राप्त
१८,३०३ विद्यार्थ्यांचे आधारच नाही
७,३१,४२९ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण
१,८६,४६६ विद्यार्थ्यांचे अपडेटिंग रखडले