नवजात बाळाच्या जन्मासोबतच हॉस्पिटलमध्ये आधार नोंदणी करणे बंधनकारक
By विकास राऊत | Published: July 18, 2024 07:48 PM2024-07-18T19:48:52+5:302024-07-18T19:49:28+5:30
बाळ जन्मत:च आधार नोंदणी केली का?
छत्रपती संभाजीनगर : बाळ जन्माला येताच आधार क्रमांक नोंदणीचा आदेश सरकारने दिलेला आहे. गेल्या सहा महिन्यांत ८ हजार ६१ पैकी १ हजार ५६० बालकांची आधार नोंदणी झाली आहे. पुरावे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बारा अंकी क्रमांकाचे कार्ड दिले जाते. त्याला आधार कार्ड म्हणतात. आधार कार्ड आता लहान मुलांसाठी बंधनकारक आहे. नवजात बाळाच्या जन्मासोबतच हॉस्पिटलमध्ये आधार नोंदणी करावी लागणार आहे. वयानुसार बायोमेट्रिक बदल होत असल्यामुळे नवजात बालकाचं आधार कार्ड तयार केले जात नव्हते. आता नवजात बालकाला जन्मासोबतच आधार नोंदणीही मिळेल. मुलांचे वय पाच वर्षे पूर्ण होईल, तेव्हा त्यांचे बायोमेट्रिक्स घेतले जातील.
जन्मत:च आधार क्रमांक नोंदणी
लहान मुलांसाठीही आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. शाळेत प्रवेश घेण्यासाठी किंवा कोणत्याही सरकारी योजनेत नोंदणीसाठी ते आवश्यक आहे. युआयडीएआयने पाच वर्षांखालील मुलांसाठी बायोमेट्रिक तपशिलांची आवश्यकता केली आहे.
सहा महिन्यांतील आकडे काय सांगतात?
८ हजार ६१ जन्म : शहरातील घाटी रुग्णालयात सहा महिन्यात सरासरी सुमारे ८ हजार ६१ बालकांचा जन्म झाला.
१,५६० आधार नोंदणी : सहा महिन्यात केवळ १ हजार ५६० नवजात शिशूंची आधार नोंदणी झाल्याचे प्रमाण आहे.
सरासरी रोज २० नोंदणी होत असल्याचे प्रमाण आहे. जिल्हा पातळीवर याचे आकडे वेगळे असतील.
- गिरीश जाधव, आधार केंद्र व्यवस्थापक
कोणत्या महिन्यात किती?
महिना....... सरासरी जन्मदर............. आधार नोंदणी
जानेवारी.....१,३४० ......................२६०
फेब्रुवारी.....१,२५८ .....................२४०
मार्च .....१,४४५ .........................२८०
एप्रिल.....१,३९७ ......................२६०
मे.....१,४१३ ..........................२८०
जून....१,२०८ .......................२४०