आद्या-आरोही होणार ब्रह्मवादिनी; दोन सख्ख्या बहिणींची होणार मौंज
By प्रशांत तेलवाडकर | Published: February 10, 2024 08:14 PM2024-02-10T20:14:23+5:302024-02-10T20:16:16+5:30
मुलींच्या मौंजीविषयी शास्त्राधार ‘कूर्मपुराणात’ दिला आहे; मराठवाड्यात प्रथमच दोन सख्ख्या बहिणींची मौंज होत आहे.
छत्रपती संभाजीनगर : नमस्कार, आज आम्ही आमच्या मुलींच्या मौंजचे आमंत्रण देण्यासाठी आलो आहोत. अरे, असे आश्चर्यचकित होण्यासारखे काय झाले? ..तुम्ही बरोबर ऐकले, आमच्या ‘आद्या’ आणि ‘आरोही’ या दोघींची मौंज... हे ऐकून तुमची उत्सुकता वाढल्याचे दिसत आहे. आपल्या वैदिक हिंदू धर्मात मुलगा व मुलगी असा भेदच मुळी केलेला नाही. मध्यंतरीच्या काळात मुलींची मौंज करण्याची प्रथा बंद झाली होती; पण आता मुलांप्रमाणे मुलींची मौंजही केली जात आहे, असे निमंत्रण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
छत्रपती संभाजीनगरात बीड बायपासवरील रहिवासी अजिंक्य व आराध्या यांच्या दोन्ही सुकन्यांचा ‘उपनयन संस्कार’ दि. ११ फेब्रुवारीला होत आहे. या मौंजीबद्दल शहरात चर्चा होत आहे. मराठवाड्यात दोन्ही सख्ख्या बहिणींवर ‘उपनयन संस्कार’ होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.
आतापर्यंत ४८ मुलींची मौंज लावणाऱ्या कोल्हापूरच्या पंडितांना आमंत्रण
मुलींची मौंज लावण्याची प्रथा मराठवाड्यात नवीन असली तरी कोल्हापूर, पुणे येथे ही जुनी प्रथा पुन्हा नव्याने रुजली आहे. कोल्हापूरचे विद्यावाचस्पती संस्कृत पारंगत वेदमूर्ती मुदूल जोशी यांनी आतापर्यंत ४८ मुलींचे ‘उपनयन संस्कार’ केले आहेत. आता ‘आद्या’ (वय ८ ) आणि ‘आरोही’ (वय ५) यांचे उपनयन संस्कार करून ते अर्धशतक पूर्ण करतील.
मुलाच्या व मुलींच्या मौंजीत काय फरक?
मुलगा-मुलगी
१) मुलांना ‘बटू’ म्हणतात - मुलींना ‘ब्रह्मवादिनी’ म्हणतात
२) मुलांचे मुंडण करतात- मुलींचे मुंडण नसते, चौल संस्कार, प्रायश्चित्त असते.
३) पांढऱ्या धाग्याचे जानवे घालतात - मुलीसाठी यज्ञोपवित ‘लाल’ रंगाचे असते.
४) मूल जानवे डाव्या खांद्याकडून उजवीकडे कंबरेपर्यंत परिधान करतात.--- मुली लाल रंगाचे जानवे माळेप्रमाणे गळ्यात घालतात.
‘कूर्मपुराणात’ माहिती
मुलींच्या मौंजीविषयी शास्त्राधार ‘कूर्मपुराणात’ दिला आहे. जसा मुलाला उपनयनानंतर ‘वेदाध्ययनाचा’ अधिकार आहे. तसाच तो अधिकार मुलीलादेखील आहे. ‘ज्ञान’ लिंग, वय, वर्णभेद करत नाही. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा या वैदिका विदुषींचे उपनयन केल्याचा व त्यांनी आपल्या ज्ञानाने वैदिक परंपरेत ठसा उमटवल्याचा उल्लेख आहे.
मुलींच्या व्रतबंधनाची पद्धत पुन्हा सुरू
आज या जगात मुलीही मुलाप्रमाणे पूर्णत: स्वावलंबी जीवन जगत आहेत. पूर्वापार चालत आलेली मुलींच्या व्रतबंधनाची पद्धत काही काळाने काही कारणात्सव बंद पडली. गुरुजींनी आम्हाला मुलींच्या मौंजीबद्दल सांगितले. ते मला पटले. माझ्या आई-वडिलांनी तशी इच्छा व्यक्त केली आणि आम्ही माझ्या दोन्ही मुलींची मौंज करण्याचे ठरविले.
-अजिंक्य दलाल
संक्षिप्त:
१) मराठवाड्यात प्रथमच दोन सख्ख्या बहिणींची मौंज होत आहे.
२) आर्य समाजाच्या वतीने दि. १७ ऑगस्ट २०१६ मध्ये शहरात विविध जातींच्या ३० मुलींवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले होते.
३) पुणे, कोल्हापूर येथे मुलींवरील उपनयन संस्कार केले जात आहेत.
४) उत्तर प्रदेशात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्रीश्री रविशंकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली काही वर्षांपासून मुलींवर उपनयन संस्कार केले जात आहेत.