'आज उदास उदास दूर पांगल्या सावल्या'; महानोर 'क्लास' सोबत 'मास'चेही कवी होते: दासू वैद्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 02:44 PM2023-08-04T14:44:08+5:302023-08-04T14:49:18+5:30

ज्या काळात  दूरदर्शन व समाज माध्यमं नव्हती त्या काळातही महानोरांसारखा कवी लोकप्रिय होता.

'Aaj Udas Udas Dur Pangalya Sawalya'; Even without social media N.D.Mahanor is in everyone's mind: Dasu Vaidya | 'आज उदास उदास दूर पांगल्या सावल्या'; महानोर 'क्लास' सोबत 'मास'चेही कवी होते: दासू वैद्य

'आज उदास उदास दूर पांगल्या सावल्या'; महानोर 'क्लास' सोबत 'मास'चेही कवी होते: दासू वैद्य

googlenewsNext

-  दासू वैद्य, कवी
ना. धों. महानोर! म्हणजे रानातला गंध शब्दात पेरणारी प्रतिभावान नाममुद्रा.एक कवी, गीतकार,लेखक म्हणून महानोरांचं‌ नाव रसिकांनी डोक्यावर घेतलं तसं समीक्षकांनी मराठी कवितेच्या केंद्रस्थानी आणलं.पांढऱ्या स्वच्छ कपड्यातले महानोर कविता म्हणायला उभे राहिले, की अवघा रसिक संमोहित व्हायचा.अशा अनेक मैफिली गावोगाव रंगवून महानोरांनी मराठी कविता तर सुदूर पोहचवलीच पण काव्य रसिकही घडवले.संत कवितेची मौखिक परंपरा पुढे नेणारा हा कवी लोकलयीत कविता गाताना ऐकणं‌ हा एक लोभस अनुभव होता.महानोरांच्या शब्दात आबादानी बहर उजागर झाला तशी असह्य 'पानझड'ही वेदना होऊन उजागर झाली.'रानातल्या कविता' या पहिल्याच कवितासंग्रहाने महानोरांचे नाव ठळक झाले. लताबाईंची 'आजोळची गाणी','जैत रे जैत','दोघी','एक होता विदूषक' ते 'जाऊंद्या न बाळासाहेब' चित्रपटातील गीतांनी आपल्यावर गारूड केलं.

ज्या काळात  दूरदर्शन व समाज माध्यमं नव्हती त्या काळातही महानोरांसारखा कवी लोकप्रिय होता. त्याला कारण म्हणजे त्यांची लोकलयीतील कविता आहेच पण त्याशिवाय महानोरांचा सर्वत्र असणारा संचार आणि लोकसंपर्क महत्वाचा ठरतो..यशवंतराव चव्हाण,पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज,शरद पवार ते सर्वसामान्य माणसांपर्यंत महानोरांच्या काव्यवाचनाचं गारूड होतं.महानोरांनी लिखित कवितेतेतून समीक्षक, अभ्यासकांना प्रभावीत केलं तर कविता गायनाने बहुसंख्य रसिक श्रोत्यांना आपलसं केलं. महानोर 'क्लास'चे कवी होते तसे 'मास'चेही कवी होते. कविता लिहिता लिहिता कविता जगण्याचा रियाज शेवटपर्यंत त्यांनी सुरुच ठेवला.प्रेक्षकांना काबीज करणारं वक्तृत्व लाभलेले महानोर बोलताना शेवटी कवितेवरच येत.कविता त्यांचा ध्यास आणि श्वासही होता.

‌‌अशा प्रतिभावान कविचा माझ्यासारख्या नव्याने लिहिणाऱ्या कवीला सहवास लाभला हे भाग्यच.मसापच्या 'प्रतिष्ठान'मधे माझ्या आठ कविता छापून आल्या होत्या.त्या कविता वाचून दोन महत्वाच्या कवींचे मला पत्र आले.त्यापैकी एक कवी भुजंग मेश्राम व दुसरे कवी साक्षात ना.धों.महानोर! ही दोन्ही पत्रं मी जपून ठेवली आहेत.महानोर फक्त पत्र लिहून थांबले नाहीत तर माझ्याकडून सर्व कविता वाचायला म्हणून मागून घेतल्या आणि परस्परच पाॅप्युलर प्रकाशनाच्या रामदास भटकळांकडे पोहोचवल्या.प्रकाशनाच्या तज्ज्ञ समितीने संमती दिल्यानंतर माझा 'तूर्तास' हा पहिला कवितासंग्रह २००३ साली प्रकाशित झाला. 

चांगल्या कवितेच्या पाठीशी उभे राहणारे महानोर नव्या लिहिणाऱ्यांवर मन:पूर्वक प्रेम करीत होते.इथून पुढं स्नेह वाढत गेला.भेटी होत गेल्या.पळसखेड,जळगावच्या घरी जाणं‌ होऊ लागलं.दरम्यान महानोरांना डोळ्यांचा त्रास सुरू झाला.महिकोवाल्या बद्रीनारायण बारवालेंचा महानोरांशी स्नेह‌ होताच.मीही जालन्याच्या बारवाले महाविद्यालयातच प्राध्यापक होतो.जालन्याच्या गणपती नेत्रालयात महानोरांचा इलाज‌ सुरू झाला.त्या दरम्यान महानोर व काकू आमच्या घरीच उतरत.दर महिन्याला त्यांना यावं लागे.दादा आणि काकू घरी आले की आमच्याकडेही त्यांना भेटणाऱ्यां ची गर्दी होई.जेवण, गप्पा, विश्रांती असा वेळ भुर्रकन निघून जाई.खरं तर गणपती नेत्रालय बारवाले साहेबांचंच असल्यामुळे महानोरांची व्यवस्था सुसज्ज विश्रामगृहात होणार होती.पण महानोर दादांनी माझ्या छोट्या घरात थांबणे पसंत केले.यात कवितेचा ऋणानुबंध होता आणि नवीन लिहिणाऱ्यावरचं प्रेमही जाणवत होतं.

त्या दरम्यान आमच्या नव्या फ्लॅटचं फर्निचर तयार झालं होतं.नव्या फ्लॅटमध्ये राहायला जायची तयारी सुरू होती.तशात महानोर दादा डोळ्यांच्या चेकपसाठी आले.वास्तुशांत वैगरे करण्याचा मानस नव्हता. मी व्यक्तिशः कुठला विधी करीत नाही.पण गृहप्रवेशाची काही तरी पूजा करावी अशी बायकोची इच्छा होती. मी सुवर्णमध्य काढला. महानोरदादा आणि काकू आलेलेच होते. बाजारातून फुलं-हार आणले. घरात सामानापेक्षा पुस्तकंच अधिक होते. पुस्तकांचे गठ्ठे नव्या घरात हलवणं सुरू होतं. मी दादांना व काकूंना गृहप्रवेशाबद्दल सांगितलं.त्यांनाही आनंद झाला.आम्ही त्यांना काही न सांगता नव्या घरात घेऊन गेलो. पण तिथं कुठलीही पूजा नव्हती किंवा गृहप्रवेशाची काही तयारीही नव्हती. त्यांचं आश्चर्य  फार न ताणता मी आमची कल्पना सांगितली. गृहप्रवेश म्हणजे महानोरदादा व काकूंच्या हस्ते पुस्तकांना फुलं वाहिली,हार घातले.पेढे वाटून तोंड गोड केलं.आणि आम्ही गृहप्रवेश केला.एका कवीच्या प्रवेशाने नवं घर गजबजून गेलं.कोणती पुण्ये अशी येती फळाला...राबता सुरू झाला.त्या घराशी महानोरांचं नाव कायम जोडल्या गेलं. आज दादा नाहीत.त्यांच्या कविता,त्यांची गाणी मात्र कायम सोबत असतील.

Web Title: 'Aaj Udas Udas Dur Pangalya Sawalya'; Even without social media N.D.Mahanor is in everyone's mind: Dasu Vaidya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.