‘आपला मानूस’ एक कौटुंबिक थरारपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:05 AM2018-02-06T01:05:13+5:302018-02-06T01:05:17+5:30

मुळातच भारतीय माणूस हा नातेसंबंधांच्या बाहेर जात नाही. आजच्या तरुणाच्या मनात मानवी जीवन आणि कुटुंबविषयक श्रद्धांविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उकल करणारा ‘आपला मानूस’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. परस्पर नातेसंबंधांवर बेतलेली गोष्ट सांगणारा हा एक कौटुंबिक थरारपट असून, चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या आपल्या माणसाची आठवण करून देणारा ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केला.

'Aapla Manoos' is a family thriller | ‘आपला मानूस’ एक कौटुंबिक थरारपट

‘आपला मानूस’ एक कौटुंबिक थरारपट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुळातच भारतीय माणूस हा नातेसंबंधांच्या बाहेर जात नाही. आजच्या तरुणाच्या मनात मानवी जीवन आणि कुटुंबविषयक श्रद्धांविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उकल करणारा ‘आपला मानूस’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. परस्पर नातेसंबंधांवर बेतलेली गोष्ट सांगणारा हा एक कौटुंबिक थरारपट असून, चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या आपल्या माणसाची आठवण करून देणारा ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केला.
वायकॉम १८ मोशन पिक्चर्स व अजय देवगण प्रस्तुत ‘आपला मानूस’ हा मराठी चित्रपट दि. ९ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने नाना यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली आणि चित्रपटासोबतच इतर अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी दिग्दर्शक सतीश राजवाडे, निर्माते निखिल साने, अभिनेत्री इरावती हर्षे, मल्हार पाटेकर यांचीही उपस्थिती होती.
चित्रपटाच्या नावातील चुकीच्या व्याकरणाविषयी विचारताच नाना म्हणाले की, ब-याचदा प्रमाण भाषेचे बांधून ठेवलेले ठोकताळे न वापरता थेट भावना पोहोचणे आवश्यक ठरते. तसेच अनेकदा बोली भाषेत आपल्या माणसाविषयी बोलताना नकळत ‘माणूस’ ऐवजी ‘मानूस’ येऊन जाते. तेच काहींसे या चित्रपटाच्या बाबतीत आहे. हा माणूस नेमका ‘मानूस’ का आहे, हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.
राहुल (सुमित राघवन) आणि भक्ती (इरावती) हे शहरी दाम्पत्य आणि त्यांचे वडील यांच्या नात्यातील गुंतागुंत गुुंफत चित्रपटाची कथा सुरू होते. वडिलांच्या अनपेक्षित मृत्यूमुळे मारोती नागरगोजे (नाना पाटेकर) हा वरिष्ठ पोलीस अधिकारी या जोडप्याच्या आयुष्यात येतो आणि त्यामुळे या जोडप्याच्या कुटुंब, जीवन याविषयीच्या संकल्पनाच ढवळून निघतात. हा चित्रपट पाहून तुम्ही तिथेच सोडून जात नाही, तर तो सोबत घेऊन जाता. चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या आपल्या मानसाला आवर्जून फोन कराल, असा विश्वास या कलावंतांनी व्यक्त केला.
आज आपण इतरांना खूप प्रश्न विचारतो, पण स्वत:ला कधीच प्रश्न विचारत नाही. स्वत:शी बोलत नाही. ही सगळ्यात मोठी समस्या आणि तरुण जोडप्यांच्या नात्यामध्ये आलेली गुंतागुंत या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे राजवाडे यांनी स्पष्ट केले.
भूमिकेविषयी भाष्य करताना इरावती म्हणाल्या की, आजच्या ‘वर्किंग वूमन’चे प्रतिनिधित्व त्या या चित्रपटातून करीत आहेत. करिअरच्या पाय-या चढताना कुठेतरी कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्याचा भक्तीच्या मनातला अपराधीपणा आजच्या वर्किंग वूमनशी साधर्म्य साधणारा असल्याचे त्या म्हणाल्या.

अनिर्बंध अभिव्यक्ती स्वातंत्र्य नकोच -नाना पाटेकर
सिनेमाला जशी ‘सेन्सॉरशिप’ असते तशी राजकीय मंचावरून, समाजमाध्यमांवरून तरुणांची माथी भडकावणा-या मंडळींच्या बोलण्यावरही ‘सेन्सॉरशिप’ असावी, असे ठाम मत नाना पाटेकर यांनी मांडले. अनिर्बंध अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध दर्शवून ते म्हणाले की, समाजात फूट किंवा अनिष्ट प्रथांचे महिमाकरण केले जात असेल तर त्यावर बंधने आलीच पाहिजे. तरुणांमध्ये घुसमट वाढतेय हे मान्य करताना नानांनी रस्त्यावर उतरून हिंसाचार करण्याला विरोध केला. तरुणांना जाती-धर्माच्या मुद्यावर लढवत ठेवणाºया नेत्यांचा समाचार घेताना नाना म्हणाले की, ‘तेढ निर्माण करणाºया नेत्यांच्या मागे जाऊ नका. सगळ्या जातीच्या आणि धर्माच्या लोकांना एकमेकांची गरज आहे. हिंसाचार कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नाही.’ यावेळी नानांनी लोकसंख्येचा महास्फोट, हरवत चाललेली नाती, ढासळती कुटुंब व्यवस्था, संवादाचा अभाव, अशा अनेक सामाजिक विषयांवर मोकळ्यापणाने भाष्य केले. शेतक-यांच्या समस्येविषयी बोलताना त्यांनी शहरात होणा-या स्थलांतराबद्दल चिंता व्यक्त केली. ‘नव्या पिढीने थोडा काळ तरी ग्रामीण भागात व्यतीत करावा. लोकसहभागातून अनेक समस्या सुटू शकतात.’ आजपर्यंतच्या प्रवासाचे चिंतन करताना ते म्हणाले की, माझ्या सातबारावर एकही जमीन नाही. मात्र, माणसं खूप आहेत. यापेक्षा मोठी श्रीमंती काय!’

Web Title: 'Aapla Manoos' is a family thriller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.