अ.भा. दलित नाट्य परिषद पुन्हा झाली कार्यरत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:19 PM2019-03-19T23:19:26+5:302019-03-19T23:21:01+5:30
: अ.भा. दलित नाट्य परिषद पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. नुकतीच एक बैठक नागसेनवनात होऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध रंगकर्मी मधुसूदन गायकवाड हे होते.
औरंगाबाद : अ.भा. दलित नाट्य परिषद पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. नुकतीच एक बैठक नागसेनवनात होऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध रंगकर्मी मधुसूदन गायकवाड हे होते.
अ.भा. दलित नाट्य परिषदेची स्थापना ३४ वर्षांपूर्वी झाली. प्रा. साहेबराव गायकवाड, मधू गायकवाड, प्रा. अविनाश डोळस, प्रकाश त्रिभुवन, प्रा. विजयकुमार गवई, डॉ. सदाशिव पंडित आदींनी सुरुवातीला दलित थिएटर स्थापन करून नाट्य चळवळ सुरू केली होती. ‘गाव नसलेलं गाव’, ‘थांबा रामराज्य येतंय’ ही नाटके या काळात खूपच गाजली. ‘थांबा राम राज्य येतंय’ची ३५० च्या वर प्रयोग झाले. पुढे ‘आवर्त, मुल्याटो, सत्यमेव जयते, एक होता राजा, युगयात्रा, नित्याची गोष्ट, वाटा पळवाटा, देव नवरी, आठवणीचे पक्षी, आंबेडकरी जलसा, हा माझा देश व स्वातंत्र्य कंच्या गाढीवचं नाव’ ही पथनाट्यही सादर करण्यात आली. पुढे काही कलावंत मंडळी वेगवेगळ्या कारणास्तव वेगवेगळ्या दिशेला गेली आणि दलित थिएटर नावाच्या संस्थेचा प्रवस मंदावला. पुढे १९८७ ला अ.भा. नाट्य परिषद स्थापन झाली व परिषदेने १० नाट्य संमेलने आयोजित केली. मंदावलेली नाट्य चळवळ पुन्हा जोमाने चालावी यासाठी व बुद्धाचा समतेचा व बाबासाहेबांचा संविधानातील विचार या नाट्य चळवळीद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे ठरले.
बैठकीस नागपूरचे प्रसिद्ध नाटककार प्रभाकर दुपारी, दादाकांत धनविजय, अशोक जांभूळकर, मुंबईचे प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे, के.बी. ब्राह्मणे, आशुतोष नाटकर, विलास गवळी, अशोक गायकवाड, दिलीप म्हस्के, तुळशीराम मोरे, औरंगाबादचे प्रा. प्रभाकर शिरोळे, प्रा. विजयकुमार गवई, प्रा. प्रकाश सिरसाट, प्रा. दिलीप बडे, नामेदव जोगदंड, प्रकाश त्रिभुवन, प्रा. दिलीप साळवे, भीमराव वाघचौरे, मधू काळे, बाजीराव साळवे, सिद्धार्थ निकाळजे आदींची उपस्थिती होती.