अ.भा. मराठी चित्रपट महामंडळाची सदस्यसंख्या दीडशेच्या वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 01:09 AM2017-11-27T01:09:40+5:302017-11-27T01:09:45+5:30
चित्रपटसृष्टीतील फसवेगिरीला आळा घालून कलावंत-तंत्रज्ञांच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात मराठवाड्यातील अद्याप दीडशेच्या वर कलाकारांनी सदस्य नोंदणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चित्रपटसृष्टीतील फसवेगिरीला आळा घालून कलावंत-तंत्रज्ञांच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात मराठवाड्यातील अद्याप दीडशेच्या वर कलाकारांनी सदस्य नोंदणी केली आहे.
चित्रपटात काम देतो अशी बतावणी करून आर्थिक फवसणुकीचे रॅकेट चालवणारे अनेक तोतया दिग्दर्शक/निर्माते अलीकडच्या काळात समोर आले. ती रोखण्यासाठी यंदाच्या मार्च महिन्यात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे सुरू झाले. महामंडळातर्फे चित्रपटसृष्टीत काम करणाºया कलाकारांना सदस्य नोंदणीनंतर ओळखपत्र देण्यात येते. त्यांना वैध आॅडिशनची माहिती व मानधन करारनामा बनविण्यात सहकार्य केले जाते. आणि जर सदस्य कलाकाराची फसवणूक झाली तर महामंडळ त्याच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या हक्काचे संरक्षण करते.
झगमगाटाच्या या दुनियेविषयी ग्रामीण भागातील मुला-मुलींना सखोल माहिती नसते. त्यामुळे त्यांची फसवणूक होण्याचा धोका अधिक असतो. त्यांच्यामध्ये जनजागृती वाढविण्याची अधिक गरज असल्याचे महामंडळाचे प्रतिनिधी शुभम त्रिभुवन यांनी सांगितले.
महामंडळाच्या औरंगाबाद कार्यालयात लेखकांची सर्वाधिक नोंदणी होत आहे. शिवाय औरंगाबाद शहरापेक्षा जालना, परभणी, नांदेड येथील कलाकारांचा प्रतिसाद
जास्त आहे. गीताची नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येत असल्याची माहिती प्रतिनिधीने दिली.
विभागीय कार्यालयात आतापर्यंत अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, चित्रपट प्रसिद्धी, रंगभूषा, पार्श्वगायक, लेखक, नृत्य दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापन आदी क्षेत्रातील दीडशेच्या वर कलावंत/तंत्रज्ञांनी नोंदणी केलेली आहे, तसेच चित्रपट बॅनर नोंदणीचीही संख्या वाढत आहे.
शहरात कार्यालय सुरू होण्यापूर्वी आर्टिस्ट कार्ड काढण्यासाठी मुंबईला जावे लागत असे.
मराठवाड्यातील चित्रपटप्रेमी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी महामंडळातर्फे लवकर शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल (लघु चित्रपट महोत्सव) आयोजित केला जाणार आहे. त्याचबरोबर इंडस्ट्रीतील यशस्वी कलाकारांसोबत स्थानिक कलावंतांचा संवाद व्हावा म्हणून त्यादृष्टीने प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, तसेच शूटिंग आणि आॅडिशनच्या नावाखाली फसवणूक रोखण्यासाठी भरारी पथकही निर्माण केले जाणार आहे.