बेवारस बॅगांच्या फोनमुळे उडाली धावपळ; बॅगांमध्ये सापडले सुरा, कत्ती अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 05:18 PM2022-11-26T17:18:53+5:302022-11-26T17:19:56+5:30
पोलीस पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे बॅग ठेवणारी एक महिला व मुलीला शोधून काढले.
औरंगाबाद :पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला उल्कानगरीत बेवारस बॅगा ठेवल्याची माहिती फोनवरून देण्यात आली. त्यानंतर आयुक्तालयात एकच धावपळ उडाली. बॉम्बशोधक नाशक पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्व प्रकारची तपासणी करीत दक्षता घेऊन बॅगा उघडल्यानंतर त्यात कपडे, एक चाकू अन् कत्ती आढळली. त्यानंतर पथकाने सुटकेचा नि:श्वास टाकला. घटनेची जवाहरनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
जवाहरनगरच्या ११२ डायल नंबरवर एका व्यक्तीने उल्कानगरीतील वर्धमान रेसिडेन्सीजवळील बोळीत तीन बेवारस बॅगा ठेवण्यात आल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांच्या गाडीने घटनास्थळी धाव घेत त्याविषयी नियंत्रण कक्षाला शुक्रवारी सायंकाळी ४:५३ वाजता कळविले. तेव्हा नियंत्रण कक्षाने तत्काळ बॉम्बशोधक व नाशक पथकास पाचारण केले. पथकाचे निरीक्षक सुशील जुमडे, नाईक महादेव शिरसाठ, गोपाल पुर्भे यांच्यासह श्वान गौरीसह तिचे हस्तक अशोक थोरात काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी जवाहरनगरचे उपनिरीक्षक संतोष राऊत, हवालदार काळे, अंमलदार शेळके, नागरे, राठोड हे सुद्धा पोहोचले. बॉम्बशोधक पथकाने सर्व प्रकारची काळजी घेत बॅगांची तपासणी केली. श्वानानेही बॅग तपासल्या. त्यानंतर तिन्ही बॅगा उघडण्यात आल्या. तेव्हा त्यात घरात टाकून देण्यायोग्य कपडे, गंजलेला सुरा, कत्तीसह इतर साहित्य आढळले. हे सर्व साहित्य जवाहरनगर पोलिसांनी जप्त करीत ठाण्यात आणले.
रिकामी जागा पाहून ठेवल्या बॅगा
निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संतोष राऊत यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे बॅग ठेवणारी एक महिला व मुलीला शोधून काढले. ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी घरातील गंजलेल्या वस्तू, कपडे कचरा गाडीत घेत नाहीत. त्यामुळे ते तीन बॅगांमध्ये भरून कोणी पाहणार नाही, अशा ठिकाणी ठेवल्याची कबुली त्यांनी दिली. त्याविषयीची नोंद करून त्यांना सोडून देण्यात आले.