नोकरी लावतो म्हणून केला ३ लाखांत सौदा; परित्यक्ता महिलेची विक्री करून राजस्थानात लावले लग्न
By राम शिनगारे | Published: March 8, 2023 05:43 PM2023-03-08T17:43:55+5:302023-03-08T17:44:34+5:30
या प्रकरणात छावणी पोलिसांनी राज्यस्थान, गुजरातमधून चौघांना बेड्या ठोकल्या.
छत्रपती संभाजीनगर : परित्यक्ता महिलेला नोकरीचे आमिष दाखवून राजस्थानामध्ये नेऊन तिची २ लाख ८० हजार रुपयांत विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात छावणी पोलिसांनी राज्यस्थान, गुजरातमधून चौघांना बेड्या ठोकल्या. या आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केल्याची माहिती निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली.
बन्सी मुलाजीराम मेघवाल (५०, रा. बोरनाडा, जि. जोधपूर, राजस्थान), लीलादेवी जेठाराम मेघवाल (४२, रा. आरतीनगर-पालगाव, जि. जोधपूर, राजस्थान), हारून खान नजीर खान (४०, रा. बिस्मिल्ला कॉलनी, मिसारवाडी), शबाना हारुण खान (३६, रा. बेरीबाग, हर्सुल) या चाैघांचा आरोपीत समावेश आहे.
छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिटमिटा परिसरातील ३० वर्षीय पीडितेला हारून व शबाना या दाेघांनी राज्यस्थानातील जोधपूर परिसरात चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्या ठिकाणी घेऊन गेले. तेथे गेल्यानंतर पीडितेला बन्सी व लीलादेवी यांना २ लाख ८० हजार रुपयात विकले. दरम्यानच्या काळात बन्सी, हारून या दोघांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. बन्सी व लीलादेवीने पीडितेची मोठ्या रकमेत विक्री करून एका तरुणासोबत लग्न लावून दिले. लग्नानंतर त्या तरुणानेही पीडितेवर दोन महिने अत्याचार केले.
याच काळात पीडितेच्या मुलाने छावणी पोलिस ठाण्यात आईच्या अपहरणाची तक्रार नोंदवली होती. पीडितेचे ज्याच्यासोबत लग्न लावले त्याच्यापासून सुटका करून घेत एका मालवाहतूक ट्रकमध्ये बसून पोलिस ठाणे गाठले. राजस्थान पाेलिसांनी पीडितेच्या नातेवाइकांसह छावणी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पीडितेची सुखरूप छत्रपती संभाजीनगरला रवानगी केली. शहरात आल्यानंतर पीडितेने छावणी ठाण्यात चार आरोपींसह लग्न लावून दिलेल्या पतीच्या विरोधात गुन्हा नोंदवला.
त्यानंतर आरोपीच्या शोधासाठी निरीक्षक कैलास देशमाने यांनी उपनिरीक्षक गणेश केदार, लक्ष्मण उंबरे, अंमलदार नारायण पायघन, सिद्धार्थ थोरात, सुमेध पवार, मंगेश शिंदे आणि मीना जाधव यांचे पथक राजस्थानात पाठविले. या पथकाने सहा दिवस राजस्थानात थांबून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर दोन आरोपींना गुजरातमध्ये पकडल्याची माहिती निरीक्षक देशमाने यांनी दिली. यासाठी सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड, उपनिरीक्षक पुंडलिक डाके, रावसाहेब जोंधळे यांनी मदत केली.