अबब..! पाच शासकीय कार्यालयांमध्ये ३५९ तपासण्या, १३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:04 AM2021-03-09T04:04:16+5:302021-03-09T04:04:16+5:30
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि दिवसभर गर्दी होणाऱ्या पाच शासकीय कार्यालयांमध्ये अँटिजन ...
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि दिवसभर गर्दी होणाऱ्या पाच शासकीय कार्यालयांमध्ये अँटिजन टेस्ट सुरू केली. सोमवारी दिवसभरात ३५९ नागरिकांची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल १३ जण पॉझिटिव्ह आढळून आले. महापालिका मुख्यालयातून एक जण चक्क पळून गेला. गुन्हा दाखल करण्याचा इशारा देताच तो स्वतः परतला.
शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिक विविध कामांसाठी येतात. शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची लागण होऊ नये यासाठी महापालिकेने खास तपासणी पथक तैनात केले आहे. सोमवारी महापालिका मुख्यालयात फक्त २७ नागरिकांची तपासणी केली. त्यामध्ये तीन जण पॉझिटिव्ह आले. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भावसिंगपुरा भागात राहणारा एक नागरिक स्वतःहून तपासणीसाठी आला. त्याला मागील दोन ते तीन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. तपासणीत तो पॉझिटिव्ह आढळून आला. पॉझिटिव्ह आल्याचे कळताच त्या नागरिकाने धूम ठोकली. या घटनेमुळे मनपाचे आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना अक्षरशः घाम फुटला. संबंधित नागरिकाला फोनवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. एक तासानंतर हे सद्गृहस्थ परत महापालिकेत आले. त्यांना रुग्णवाहिकेमधून सीसीसी सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.
पोलीस आयुक्त कार्यालयात ३२ पैकी एक जण, जिल्हाधिकारी कार्यालयात ६३ पैकी २, विभागीय आयुक्त कार्यालयात ९४ पैकी २ नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले. नागरिकांनी तपासणीसाठी स्वतःहून पुढे यावे आणि उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.