अबब... चिमुकल्याच्या गळ्यात ५ सें. मी.ची तार !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 08:31 AM2023-01-31T08:31:32+5:302023-01-31T08:32:05+5:30
लहान मुले खेळत खेळत काय गिळतील? काय नाकात - कानात घालतील, याचा नेम नाही. दौलताबाद येथील ६ वर्षीय चिमुकल्याने कपडे वाळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिमट्याची ५ से. मी. लांबीची तारच गिळली.
औरंगाबाद : लहान मुले खेळत खेळत काय गिळतील? काय नाकात - कानात घालतील, याचा नेम नाही. दौलताबाद येथील ६ वर्षीय चिमुकल्याने कपडे वाळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिमट्याची ५ से. मी. लांबीची तारच गिळली. ही तार अन्ननलिकेत अडकली. परिणामी, अन्ननलिका फाटण्याचा धोका होता. अशा अत्यवस्थ अवस्थेत दाखल झालेल्या या बालकाच्या अन्ननलिकेत अडकलेली तार दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करून काढून जीव वाचविण्याची किमया घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी केली.
दौलताबाद येथील रहिवासी असलेल्या बालकाला घेऊन पालकांनी रविवारी घाटीत धाव घेतली. क्षणाचाही विलंब न करता डाॅक्टरांनी अन्ननलिकेत अडकलेली तार काढली. या मुलाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. कान - नाक - घसा विभागप्रमुख डाॅ. सुनील देशमुख यांनी ही शस्त्रक्रिया केली. डाॅ. प्रशांत केचे, डाॅ. सोनाली जटाळे, डाॅ. शैलेश निकम, भूलतज्ज्ञ डाॅ. गायत्री तडवळकर, डाॅ. अंकिता राठी यांच्यासह परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी मदत केली. अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. विजय कल्याणकर यांनी विभागातील डाॅक्टरांची याबद्दल प्रशंसा केली.
मुलाने काही गिळल्यानंतर सर्वांत आधी काय कराल?
मुलांनी काही गिळल्यानंतर अनेकजण पाठीत, छातीवर मारतात. परंतु, असे करू नये. मुलांनी काही गिळल्याचे लक्षात येताच तत्काळ जवळच्या कान - नाक - घसातज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. लहान मुले खेळताना तोंडात, कानात काही वस्तू टाकत असतील, तर वेळीच त्यांना रोखले पाहिजे, अन्यथा शस्त्रक्रियेची वेळ येऊ शकते. लहान मुलांना बिया असणारी फळे देता कामा नये अथवा बिया काढून फळ दिले पाहिजे.