अबब... सिझेरियन दरम्यान बाळाच्या वजनाइतकीच काढली गाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 05:00 PM2022-02-16T17:00:18+5:302022-02-16T17:02:04+5:30
खासगीत लाखभर रुपयांत होणारी शस्त्रक्रिया झाली मोफत
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : एखादी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया म्हटली की सरकारी रुग्णालयात होणार नाही, असाच अनेकांचा समज आहे. मात्र, सिझेरियन प्रसूतीदरम्यानच जवळपास नवजात बाळाच्या वजनाइतकीच गाठ काढत जिल्हा सामान्य रुग्णालयातील डाॅक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्याची किमया केली. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी किमान लाखभर रुपये लागले असते. मात्र, जिल्हा सामान्य रुग्णालयात ती अगदी मोफत झाली.
जिल्हा सामान्य रुग्णालयात चिकलठाणा परिसरातील एक २६ वर्षीय महिला गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात नियमित तपासणीसाठी आली होती. तेव्हा तिच्या अंडाशयात गाठ असल्याचे निदान झाले. गरोदरपणामुळे गाठ काढण्याची शस्त्रक्रिया लगेच करणे शक्य नव्हते, तसेच गर्भपात करणेही अशक्य होते. त्यामुळे गरोदरपणाचे पूर्ण ९ महिने पूर्ण होईपर्यंत महिलेची नियमित तपासणी करण्यात आली. यादरम्यान गाठ आणखी वाढतच गेली. गरोदरपणाचे ९ महिने पूर्ण झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांनी सिझेरियन प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. अखेर ९ फेब्रुवारी रोजी ही सिझेरियन प्रसूती पार पडली. सिझेरियननंतर लगेच गाठ काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कमलाकर मुदखेडकर, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. कविता जाधव यांनी ही शस्त्रक्रिया केली. भूलतज्ज्ञ डाॅ. संजय चव्हाण, परिचारिका ज्योती सुळके, मीना पोटे, भारती निर्मळ, सुनीता घोरपडे यांनी मदत केली.
बाळाचे अन् गाठीचे वजन किती?
नवजात बाळाचे वजन अडीच किलो आहे, तर अंडाशयातील झालेली गाठ ही दोन किलो वजनाची होती. ही गाठ तशीच ठेवली असती तर पुढे महिलेच्या जीविताला धोका नाकारता येत नव्हता. त्यामुळे सिझेरियनबरोबरच गाठ काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. बाळ आणि माता सुखरूप असून, लवकरच त्यांना सुटी दिली जाणार आहे, असे डाॅ. कमलाकर मुदखेडकर यांनी सांगितले.