अबब... औरंगाबादचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ४८.२७! दुसऱ्या लाटेतील ४४ चा विक्रमही मोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 07:32 PM2022-01-24T19:32:34+5:302022-01-24T19:33:21+5:30
सक्रिय रुग्णांची संख्या ५,३९४ असून यातील ५,०१७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत
औरंगाबाद : कोरोनाची तिसरी लाट दररोज नवीन विक्रम प्रस्थापित करीत आहे. रविवारी औरंगाबाद शहराचा पॉझिटिव्हिटी रेट चक्क ४८.२७ पर्यंत पोहोचला. दिवसभरात तब्बल ७७९ बाधित रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्हिटी रेट ४४ पर्यंत पोहोचला होता. आता १०० नागरिकांनी तपासणी केली, तर किमान ४९ जण बाधित आढळून येत आहेत. वाढलेला संसर्ग लक्षात घेता प्रशासनाचीही झोप उडाली आहे. शहरात आणखी काही कडक निर्बंध लावावेत का, असा विचार प्रशासनाने सुरू केला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बाधित रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. घशात त्रास, ताप, सर्दी, अंग दुखणे, अशी लक्षणे आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ज्या पद्धतीने रुग्णांना त्रास होत होता, तसा आता नाही. त्यामुळे ‘आयसीएमआर’च्या गाइडलाइननुसार ९५ टक्के रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी देण्यात येत आहे. महापालिकेकडून मागील काही दिवसांपासून स्वत:हून तपासण्या बंद करण्यात आल्या आहेत. जे नागरिक स्वत:हून येत आहेत, त्यांचीच तपासणी केली जात आहे. रविवारी दिवसभरात फक्त १,६१८ जणांची कोरोना टेस्ट केली. त्यात आरटीपीसीआर १,१८३, तर अँटिजन टेस्टची संख्या ४३५ होती. त्यातील ७७९ जण बाधित असल्याचे सायंकाळी समोर आले. शहरात सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ३९४ पर्यंत गेली. त्यातील ५ हजार १७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. घाटी रुग्णालयात ५४, खाजगी रुग्णालयांमध्ये १६०, मेल्ट्रॉनमध्ये ४०, मनपाच्या कोविड सेंटरमध्ये १४० रुग्ण आहेत.
वयोगटानुसार रविवारचे बाधित
वय----बाधित
० ते ५---०७
६ ते १४---२९
१५ ते १८---२७
१९ ते ५०---५२८
५० पेक्षा अधिक-१८८
एकूण-----७७९
मागील आठ दिवसांतील संसर्ग स्थिती
दिनांक-तपासण्या-बाधित-पॉझिटिव्हिटी रेट
१५---२,३१३---४२३---१८.४६
१६---२,५३९---५१९---२०.५२
१७---३,०९५---३३०---१०.७६
१८---२,०६२---७०१---३४.२९
१९---२,३४६---७६७---३२.९९
२०---२,३३५---७३४---३१.६१
२१---२,२६६---७५८--३३.८९
२२---२,१९७---७९०--३६.००
२३----१,६१८---७७९--४८.२७