अबब..! मातीच्या विटा दुपटीने महागल्या; नव्या घराचे स्वप्न पुन्हा अधुरे राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2022 12:58 AM2022-01-02T00:58:49+5:302022-01-02T01:00:02+5:30
सिमेंट फ्लाश ॲशच्या विटांचा भाव ६ ते १० रुपये दरम्यान आहे. लाल विटांपेक्षा या परवडतात
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : सिमेंट, लोखंड, खडी, वाळू हे साहित्य महागले आहे. त्यासोबतच मागील पाच वर्षांत विटांचे भाव दुपटीने वाढल्याने त्याचा परिणाम घराच्या किमती वाढण्यावर झाला आहे. बांधकाम खर्च ३० ते ३५ टक्क्यांनी वाढल्याने घर खरेदीदारांचे बजेट कोलमडले आहे. आता घर खरेदी करणे हे सर्वसामान्यांसाठी पुन्हा दिवास्वप्न ठरत आहे.
का वाढले दर ?
मागील ५ वर्षांपासून मातीच्या विटांचे भाव सातत्याने वाढत आहे. कारण, मातीचे दर वाढले आहेत. तसेच कोळसा, वाळू, वाहतूक खर्च वाढला तसेच जागेचे भाडेही वाढले आहे. याचा एकंदरीत परिणाम विटांच्या भाववाढीवर होत आहे.
एएसी ब्लॉकच्या विटा परवडतात
बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले की, इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या म्हणण्यानुसार आता बांधकामात लाल विटांचा वापर बंद करावा. त्यानुसार आता एएसी ब्लॉकचा वापर वाढत आहे. सिमेंट फ्लाश ॲशच्या विटांचा भाव ६ ते १० रुपये दरम्यान आहे. लाल विटांपेक्षा या परवडतात; पण वजन जास्त असते. यामुळे भार जास्त असतो. एएसी ब्लॉक ३५०० रुपये प्रति घन मीटर आहे. याच्या किमती हजाराने महागल्या; पण लाल विटापेक्षा हे ब्लॉक परवडतात.
म्हणून वाढल्या घराच्या किमती
सिमेंट, वीट, लोखंड, वाळू, खडी सर्वांच्या किमती वाढल्याने घराच्या बांधकामाचा खर्च ३० ते ३५ टक्क्यांनी वाढला आहे. यात १ हजार स्क्वेअर फुटांच्या बांधकामाला १५ लाख खर्च येत असे; आता २० लाख लागत आहेत.
भाव वाढतच राहणार
वीटभट्टीवाल्यांनी सांगितले की, पूर्वी माती फुकट मिळत असे. मात्र, आता मातीचे पैसे मोजावे लागतात. वाहतूक खर्च वाढला, कोळसा महागला. मजुरी वाढली एवढेच नव्हे तर जागेचे भाडे वाढले; यामुळे विटांचे भाव नाईलाजाने वाढवावे लागत आहेत. त्यात आता सिमेंट आणि एएसी ब्लॉकने विटांचा व्यवसाय कमी केला आहे. याचा फटकाही वीटभट्टी व्यावसायिकांना बसत आहे.
वर्ष विटांचे दर (प्रतिनग)
२०१७ ५ रु - ७ रु
२०१८ ५.५० रु- ७ रु
२०१९ ६ रु- १० रु
२०२० ६.५० रु - ११ रु
२०२१ ८ रु- १४ रु