अबब...! दोन आठवड्यांत विधी अभ्यासक्रमाच्या दोन हजार पदव्यांचे वितरण; जाणून घ्या कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 05:14 PM2021-06-29T17:14:31+5:302021-06-29T17:17:17+5:30
Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university : दीक्षांत समारंभाच्या अगोदरपासून पदवी व पदव्युत्तर विधी अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त करण्यासाठी विद्यापीठाकडे हजारो अर्ज प्राप्त झाले आहेत.
औरंगाबाद : अबब...! दोन आठवड्यात तब्बल दोन हजार विधी अभ्यासक्रमाच्या पदव्यांचे वितरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी एकाच अभ्यासक्रमाच्या पदव्या घेण्याऱ्या विद्यार्थ्यांची झालेली गर्दी पहिल्यांदाच अनुभवली आहे. विशेष म्हणजे, गर्दी करणारे हे विद्यार्थी बहुतांशी विविध न्यायालयांमध्ये व्यवसाय करणारे वकील आहेत. ( Distribution of two thousand degrees of the Law course in two weeks )
केंद्रीय नोटरीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ३० जूनपर्यंत आहे. त्यामुळे विधी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व सध्या विविध न्यायालयांमध्ये वकिलीचा व्यवसाय करत असलेल्या विद्यार्थ्यांची पदवी घेण्यासाठी अलीकडे दोन आठवड्यापासून विद्यापीठात गर्दी वाढली आहे. केंद्रीय नोटरीसाठी पात्र ठरलेले वकील देशात कुठेही हा व्यवसाय करू शकतात, तर राज्य नोटरीसाठी पात्र ठरलेल्या वकिलांना राज्यातील ठरवून दिलेल्या तालुका किंवा जिल्ह्यातच व्यवसाय करता येतो. त्यामुळे केंद्रीय नोटरीसाठी बहुतांशी वकिलांचा कल वाढलेला यावरून स्पष्ट होते.
दीक्षांत समारंभाच्या अगोदरपासून पदवी व पदव्युत्तर विधी अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त करण्यासाठी विद्यापीठाकडे हजारो अर्ज प्राप्त झाले आहेत. सध्या परीक्षा विभागातील कर्मचारी या अभ्यासक्रमाच्या पदव्या वितरणामध्येच व्यस्त आहेत.