अबब! १३७ किलो वजनाच्या रुग्णाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:02 AM2021-02-11T04:02:11+5:302021-02-11T04:02:11+5:30
हृदय न उघडता केले व्हॉल्व्ह रोपण ‘एमजीएम’च्या डॉक्टरांचे यश : रुग्णाचे चालणे झाले सुसह्य औरंगाबाद : एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय ...
हृदय न उघडता केले व्हॉल्व्ह रोपण
‘एमजीएम’च्या डॉक्टरांचे यश : रुग्णाचे चालणे झाले सुसह्य
औरंगाबाद : एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी तब्बल १३७ किलो वजन असलेल्या ६० वर्षीय रुग्णाची जटिल शस्त्रक्रिया यशस्वी केली. कोणतीही चिरफाड आणि हृदय उघडे न करता अँजिओप्लास्टीप्रमाणे कॅथेटर टाकून हृदयाचे व्हॉल्व्ह रोपण केले आणि रुग्णाला नवीन आयुष्यच दिले.
बुधवारी एका पत्रकार परिषदेत या शस्त्रक्रियेविषयी उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. प्रशांत उदगिरे, डॉ. योगेश बेलापूरकर, डॉ. नागेश जांबुरे यांनी माहिती दिली. या रुग्णाला २ वर्षांपासून कष्टाची कामे केल्यानंतर दम लागत असे. छातीत दुखणे, चक्कर येणे असाही त्रासही होत होता. प्रारंभी रुग्णाने लठ्ठपणाबद्दल उपचार घेतले. परंतु टुडी इको, कलर डाॅपलरच्या तपासणीतून रुग्णाला एओरटिक व्हॉल्व्ह, जो शरीराच्या उर्वरित भागाला हृदयाशी जोडतो, तो आकाराने लहान झाल्याचे निदान झाले. त्यामुळे झडप उघडणे प्रतिबंधित होऊन शरीराच्या उर्वरित भागात रक्त प्रवाहात अडथळा होत होता. त्यामुळे ट्रान्सकॅथेटर एओरटिक व्हाॅल्व्ह रिप्लेसमेंट इंटरव्हेंशनल कार्डीओलाॅजीतील जटिल शस्त्रक्रिया करण्यात आली. पारंपरिक उपचारात ओपन हार्ट शस्त्रक्रियेद्वारे झडप बदलली जाते; परंतु या रुग्णाचे हृदय उघडे न करता झडप बदलण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर आता चालताना कोणताही त्रास होत नाही, असे रुग्णाने सांगितले.
चौकट..
शस्त्रक्रिया करणारे डाॅक्टर्स
अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बाेहरा, डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रशांत उदगिरे, डॉ. योगेश बेलापूरकर, डॉ. अभिनव छाबडा, डॉ. राहुल पटणे, डॉ. सागर दिवेकर, डॉ. प्रीतेश इंगोले, डॉ. प्रशांत महाजन, डॉ. नागेश जांबुरे, डॉ. अजिता अन्नछत्रे यांनी ही शस्त्रक्रिया केली.