अबब..! एका पिलाची किंमत एक लाख रुपयांच्या पुढे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:07 AM2021-03-13T04:07:53+5:302021-03-13T04:07:53+5:30
नाचनवेल : शेतीला जोडधंदा केल्याशिवाय शेती करणे परवडत नाही. त्यामुळे शेतकरी नवीन प्रयोग करू लागले आहेत. असाच अनोखा प्रयोग ...
नाचनवेल : शेतीला जोडधंदा केल्याशिवाय शेती करणे परवडत नाही. त्यामुळे शेतकरी नवीन प्रयोग करू लागले आहेत. असाच अनोखा प्रयोग नाचनवेलच्या शहा बंधूंनी केला आहे. त्यांनी शेतीबरोबरच शेळीपालन केले असून यात आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्यांचे पालन केले. विशेष म्हणजे या शेळ्यांच्या पिलांना लाखो रुपयांची किंमत असून त्यांना बाजारात चांगली मागणी आहे.
नाचनवेलच्या अलीम शहा व जावेद शहा या तरुण शेतकरी बंधूनी कन्नड-सिल्लोड महामार्गालगत फार्म उभारून शेळीपालन व्यवसायाला सुरुवात केली. यासंबंधीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दहा लाख रुपयांचे भांडवल गुंतवून शेळ्यांची खरेदी केली. आजघडीला शहा बंधूंकडे आफ्रिकन बोर जातीच्या पंधरा शेळ्या आहेत. या जातीच्या शेळीच्या पिलांची विक्री करणारे परिसरातील एकमेव शेळीपालन केंद्र म्हणून नावारूपास आले आहे.
इतर शेळ्यांच्या तुलनेने आफ्रिकन जातीची शेळी चांगली वाढते. त्यांच्यात रोगप्रतिकारक क्षमता जास्त आहे. या शेळ्यांच्या पिलांना बाजारपेठेत मागणी आहे. त्यामुळे पिलांचा जन्म होण्याआधीच त्यांची बुकिंग होत असल्याचे शहा यांनी सांगितले. आतापर्यंत प्रजननासाठी शेळीच्या पिल्ल्यांची विक्री केली असून एका पिलासाठी लाखापर्यंत दर दिला जात आहे. यापुढील काळात बोर व देशी जातींच्या संकरातून सर्वसामान्य शेळीपालकांना परवडेल, अशी जात विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे. सतत वाढत चाललेल्या बेरोजगारीने निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या तरुणाईला शहा बंधूंचा नावीन्यपूर्ण प्रयोग नक्कीच दिशादर्शक ठरेल.
सामाजिक बांधिलकी जोपासली
काही दिवसांपूर्वी पाल येथील शेळीपालन करणाऱ्या वृद्धा साखराबाई बनसोड यांच्या दहा शेळ्या लांडग्यांच्या हल्ल्यात ठार झाल्या. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन हिरावले गेले; परंतु शहा बंधूंनी महाराष्ट्र गोट फार्म समूहाच्या माध्यमातून निधी गोळा करून पंचेचाळीस हजार रुपयांची मदत साखराबाई बनसोड यांना केली.
----
फोटो : नाचनवेल येथील शेळीपालन फार्म