अबब...! छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर धावते १२.५० लाखांची सायकल
By प्रशांत तेलवाडकर | Published: June 3, 2024 01:30 PM2024-06-03T13:30:03+5:302024-06-03T13:32:11+5:30
जागतिक सायकल दिवस: लक्झरी कारच्या किमतीत सायकल, सर्वसामान्य ग्राहकही खरेदीत पुढे
छत्रपती संभाजीनगर : सर्वांत स्वस्त वाहन, प्रदूषणमुक्त सवारी म्हणून सायकलीकडे पाहिले जाते. एकेकाळी गरिबाचे वाहन म्हणून लोकप्रिय ठरलेल्या सायकलीला आता ‘अच्छे दिन’ आले आहेत. ती आता महागड्या कारशी स्पर्धा करू लागली आहे. शहरात लक्झरी कारच्या किमतीत सायकल विकत आहे. १२ लाख ५० हजार रुपयांची सायकल शहरात विकली जात आहे. अशा महागड्या सायकली खरेदी करणारा हौशी वर्गही येथे आहे. म्हणूनच तर आजघडीला एक-दोन नव्हे, तर अशा तब्बल १३ ते १५ सायकली शहरात चालविल्या जात आहेत.
सायकलीची ‘रोड बाइक’ नवीन ओळख
सुपर बाइक्स आणि सुपर कारच्या जमान्यात सायकलही मागे राहिली नाही. सायकलही रोड बाइक म्हणून नवीन ओळख मिळाली आहे. प्रगत तंत्रज्ञानयुक्त सायकली बाजारात दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे सुपर कार बनविणाऱ्या कंपन्यांनी या ‘रोड बाइक’ तयार केली आहे. १२.५० लाख रुपयांत मिळणारी सायकल ९५ टक्के अतिशय मजबूत कार्बन फायबरपासून बनलेली आहे. तिचे वजनही केवळ ५ ते ६ किलो आहे. यामुळे या सायकली वजनाने अत्यंत हलकी आहे. सीट, हँडलसह इतर सर्व भाग देखील कार्बन फायबरचे आहेत. हायड्रोलिक डिस्क ब्रेक सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक्स गिअर सिस्टीम अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. रोड बाइक ३ लाखांपासून ते १२.५० लाखांपर्यंत शहरात विकत आहेत.
ई-सायकल का जमाना है भाई
ई-बाइक, इ-कारसोबत आता इ-सायकलचाही जमाना आला आहे. बॅटरी चार्ज होण्यासाठी ४ तास लागतात, तर एकदा चार्ज झाली की, सायकल ३० कि.मी.पर्यंत जाऊ शकते. जर पँडलचा वापर केला तर ४० कि.मी.पर्यंतही सायकलिंग करता येते. २५ हजारांपासून ते ६४ हजारांपर्यंतच्या ई-सायकल शहरात विकल्या जात आहेत.
दर महिनाला विकतात ९०० सायकली
शहरात महिनाला ८०० ते ९०० सायकली विकल्या जातात. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर सायकलीच्या विक्रीत १५ ते २० टक्क्याने वाढ होते. जे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत भाग घेतात
सर्वसामान्य ग्राहकही खरेदीत पुढे
ते ‘रोड बाइक’ सायकल खरेदी करतात. आता ई-सायकल सर्वसामान्य ग्राहकही खरेदी करू लागले आहेत.
- निखिल मिसाळ, सायकल वितरक
किती टक्के लोक, कोणत्या किमतीदरम्यान सायकल खरेदी करतात
खरेदीदारांची टक्केवारी किंमत
१) ६० टक्के ---------- ३ हजार ते ३० हजार रु.
२) ३० टक्के-----------३५ हजार ते दीड लाख रु.
३) १० टक्के----------- दीड लाखाच्या वरील किमती.